Santosh Deshmukh Somnath Suryawanshi Murder Case: "मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले व आता मंत्र्यांचे बंगले वाटपही पार पडले, पण परभणीत सोमनाथ सूर्यवंशी व बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे नक्की काय झाले? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस सरकार देऊ शकलेले नाही. सूर्यवंशी व देशमुख यांचे खून झाले व हे दोन्ही खून सरकार पुरस्कृत आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी ‘एसआयटी’ चौकशीचा जो खेळ मांडला आहे, ती धूळफेक आहे," असा घणाघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.


फडणवीस आणि अजित पवारांच्या अवतीभवती...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"संतोष देशमुख या सरपंचाची बीडच्या रस्त्यावर निर्घृणपणे हत्या झाली. देशमुख यांना किती निर्घृणपणे मारले याचे हृदय पिळवटून टाकणारे कथन आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केले. आमदार संदीप क्षीरसागर यांनाही हे सर्व सांगताना रडू कोसळले. पण या खून प्रकरणातले खरे आरोपी व सूत्रधार हे सरकारमध्ये सन्मानाने विराजमान आहेत. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अवतीभवती, मंत्रिमंडळात ते वावरत आहेत," असं सूचक विधान 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आलं आहे.


ते विधान राहुल गांधींपेक्षा मोदींनी अधिक तंतोतंत लागू होते


"सोमनाथ सूर्यवंशीची हत्या परभणीत पोलीस लॉकअपमध्ये झाली. संविधान रक्षणासाठी त्यांचे बलिदान झाले. संसदेत संविधानावर चर्चा सुरू असताना पोलीस मारहाणीत सूर्यवंशी मरण पावले. हा सरळ सरळ अत्याचार आहे, पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. सूर्यवंशी त्यांच्या आजाराने मेले, असा कांगावा त्यांनी केला व आता सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेण्यासाठी राहुल गांधी परभणीत आले तर फडणवीस हे वाटाण्यासारखे तडतड करू लागले. फडणवीस म्हणतात, ‘राहुल गांधी हे फक्त राजकीय हेतूने परभणीत आले होते. लोकांमध्ये आणि जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करायचा हे एकच ध्येय त्यांचे आहे. तेच काम ते गेली अनेक वर्षे सातत्याने करीत आहेत.’ फडणवीस यांचे हे वक्तव्य गांधींपेक्षा नरेंद्र मोदी यांना तंतोतंत लागू होते," असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.


महाराष्ट्रातले भाजप सरकारच जबाबदार


"देशात जातीय, धार्मिक विद्वेषाचे जे जहर गेल्या दहा वर्षांत पसरले त्या विषाची खाण म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहांकडे बोट दाखवावे लागेल. परभणी व बीडच्या हत्या या जातीय द्वेषातूनच झाल्या व त्यास महाराष्ट्रातले भाजप सरकार जबाबदार आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.