धनंजय शेळके, झी मीडिया, मुंबई : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यास शेवटच्या क्षणी यश आलं असलं तरी अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी आपआपल्या विरोधकांचे हिशेब चुकते केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातून साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो अशी चर्चा आहे. शिंदे यांच्या विरोधात उभे असलेल्या ज्ञानदेव रांजणे यांना शिंदेंच्या विरोधकांनी ताकद दिल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे आकडे बाजूने नसतानाही रिंगणात उतरलेल्या एका मंत्र्यालाही पराभवाची चव चाखावी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


दुसरीकडे सांगली जिल्हा बँक निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना प्रणित सहकार विकास पॅनल तर भाजपाचे शेतकरी विकास पॅनल अशी थेट निवडणूक झाली असली तरी, क्रॉस वोटिंग झाल्यामुळे अनेक उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. 


बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र भाजपाला देण्यात येणाऱ्या काही जागांच्या बाबत काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. बिनविरोध निवडणूक केली नसल्याने याचा काही प्रमाणात फटका काँग्रेस पक्षाला बसणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. काँग्रेसचे दोन ते तीन दिग्गज ऊमेदवार अडचणीत असल्याचंही सांगितलं जात आहे.