तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यात दोन दिवसांपूर्वी एक खळबजनक घटना समोर आली होती. साताऱ्याच्या रविवार पेठेमध्ये सोमवारी रात्री महिलांच्या शौचालयात अचानक विद्रूप चेहरा असलेली महिला दिसल्याने एकच गोंधळ उडाला होता. या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने काही काळ येथे संपूर्ण काळोख पसरला होता. त्यानंतर शौचालय गेलेल्या महिलांना तिथे एका विचित्र आकृती दिसल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सत्य समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. आता याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यातील रविवार पेठेत महिला शौचालयात पुतळा ठेवल्या प्रकरणी चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. चौघांपैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेचा देखील समावेश आहे. महिलांना भीती दाखवण्याच्या उद्देशाने सार्वजनिक शौचालयात विद्रूप पुतळा ठेवण्यात आला होता. यानंतर संबंधितांवर कारवाईची मागणी या भागातील नागरिकांनी केली होती. थेट राज्य महिला आयोगाने देखील पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीचे निवेदन दिल्यानंतर सातारा पोलिसांनी आरोपींचा छडा लावण्यात यश मिळवले आहे.


रविवारी रात्री शहरातील रविवार पेठे इथल्या महिलांच्या शौचालयामध्ये एका महिलेची आकृती दिसून आली होती. लाईट गेल्याने बॅटरीच्या प्रकाशामध्ये काही महिला शौचालयामध्ये गेल्या होत्या. मात्र शौचालयाच्या दारापासून काही फूट अंतरावर असलेल्या बेसिनजवळ एका महिलेची आकृती गुडघ्यांवर डोकं ठेऊन पांढरं कापड शरीराभोवती गुंडाळून बसल्याचं दिसून आलं. हे दृष्य पाहून घाबरलेल्या महिला शौचालयाबाहेर पळाल्या. त्यांनी घडलेला प्रकार तिथल्या लोकांना सांगितला. त्यानंतर  या घटनेचा व्हिडीओ शहरभर व्हायरल झाला. लोकांनी जवळ जावून पाहिले असता कोणीतरी दुकानातील पुतळ्याला म्हणजेच मॅनेक्यूला पांढरी चादर गुंडाळून त्या ठिकाणी बसवल्याचे निदर्शनास आले.


पोलिसांनी काय सांगितले?


"रविवारच्या रात्री अज्ञात इसमांनी लोणार गल्ली रविवार पेठ इथल्या सार्वजनिक शौचालयात एका महिलेचा पुतळा ठेवून भीतीचे वातावरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर याप्रकरणी अनेक बातम्या आल्या. त्या अनुषंगाने आम्ही त्याचा तपास केला. तपासानंतर ही घटना उघडकीस आणण्यास यश आलं आहे. यामध्ये तिघांचा समावेश असल्याचे समोर आलं असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई येत आहे. अशा पद्धतीचे प्रकार करणे हा सार्वजनिक उपद्रव आहे. असा प्रकार कोणी करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करणार आहोत. असे कोणी करत असेल तर त्याला सातारा पोलीस सोडणार नाही," असा इशारा पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिला.