Crime News : फ्लोटिंग गोल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (Whale Vomit) तस्करी करणाऱ्या चौघांना सातारा (Satara Police) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या व्हेल माशाचा उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारात 5 कोटी 43 लाख एवढी किंमत असल्याचं पोलिसांचे सांगणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे आरोपी या उलाटीची काळ्या बाजारात तस्करीसाठी अॅम्बुलन्सचा (ambulance) वापर करत होते. पोलिसांनी सापळा रचत आरोपींना अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी केली अटक


सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील दिग्वीजय टोयोटा शोरुमच्या समोर चारजण व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एम.एच. 08 ए.पी. 3443 क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्समधून चारही आरोपी तिथे आले. पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. तपासणीमध्ये आरोपींकडे व्हेल माशाची उलटी आढळून आली आहे. या उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 5 कोटी 43 लाख एवढी असल्याचे समोर आले आहे. सिध्दार्थ विठ्ठल लाकडे, अनिस इसा शेख,  नासिर अहमद रहिमान राऊत, किरण गोविंद भाटकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याचे समोर आले आहे. आरोपींवर वन्यप्राणी संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39, 42, 43, 44, 48, 51 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.


व्हेल माशाची उलटी एवढी महाग का आहे?


व्हेल माशाची उलटी किंवा अ‍ॅम्बरग्रीस तुमच्या खिशात छिद्र पाडू शकते. एका किलोग्रॅम व्हेल माशाच्या उलटीची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. अ‍ॅम्बरग्रीसला समुद्राचा खजिना आणि तरंगणारे सोने असेही म्हटले जाते. हे अत्यंत मौल्यवान असून त्याची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे. अ‍ॅम्बरग्रीसचा वापर परफ्यूम तयार करण्यासाठी केला जातो. तसेच हे कामोत्तेजक मानले जाते आणि त्याचा काही औषधांमध्येही वापर केला जातो. दरम्यान, भारतात, अ‍ॅम्बरग्रीस विक्री कायद्याद्वारे प्रतिबंधित आहे कारण व्हेल ही धोक्यात असलेली प्रजाती आहे. तसेच व्हेल मासा ही प्रजाती वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित आहे. 1970 मध्ये व्हेलला लुप्तप्राय प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले होते.


नागपूर विमानतळावर 1.80 कोटींचे सोने जप्त


दुसरीकडे, नागपूर विमानतळावर 1.8 कोटीचे 3.36 किलोग्राम सोने एका प्रवाशाकडून जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय तस्कर सोन्याची तस्करी करणार असल्याची माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. सोन्याची तस्करी करणाऱ्या या प्रवाशाने पेस्ट स्वरूपातील हे सोने सात पॅकेज मध्ये जीन्स पॅन्टच्या आतील भागात स्टीच करून लपवून ठेवले होते. हा प्रवासी दोहा येथून मंगळवारी नागपुरात आला असता ही कारवाई केली. नागपुरात हे सोने तो कोणाला देणार होता याची चौकशी आता करण्यात येत आहे