नवरा बायकोचं भांडण... शेजारील ९ जणांचं २ तासात ५० लाखांचं नुकसान
सातारा जिल्ह्यातील चाफळ गावातील हा प्रकार आहे. संजय रामचंद्र पाटील आणि पत्नी पालवी यांच्यात दिवसभरात वाद सुरु होता
सातारा : नवरा बायकोची लहानमोठी भांडणं होत असतात, पण हे नवरा बायकोचं भांडणं ५० लाखात पडलं आहे, कारण यात १० घरं जळून खाक झाली आहेत. सातारा जिल्ह्यातील चाफळ गावातील हा प्रकार आहे. संजय रामचंद्र पाटील आणि पत्नी पालवी यांच्यात दिवसभरात वाद सुरु होता. या पती- पत्नीच्या भांडणात पतीचा राग अनावर झाला आणि त्याने स्वत:च्या घराला आग लावली.
दुर्दैवाने या आगीत घरातील सिलिंडरनेही पेट घेतला. या आगीने रौद्ररुप धारण केलं. या आगीत भिंतीला भिंत लागून असल्याने ९ जणांच्या घराला आग लागली. यात सर्वांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू, धान्य, शेतीचं साहित्य, दागदागिने, पैशांची रोकड आगीत जळून खाक झाली.
ग्रामस्थांनी साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबाना फोन केला, पण त्याआधीच आग नियंत्रणाबाहेर गेली होती. यात घरातील टीव्ही, फ्रीज देखील जळून खाक झाले. कपडे, अंथरुण देखील आता या लोकांकडे नाहीय. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही.
ग्रामपंचायतीने देखील नळांना पाणी सोडलं आणि तरुणांनी ते पाणी मिळेल त्या भांड्यांनी टाकून आग विझवली, २ तासात आग मंदावली, पण १० संसारातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.