तुषार तपासे, झी २४ तास, सातारा | बातमी एका धाकड, शूरवीर तरुणीची. ग्रामीण भागात जिथे उच्च शिक्षण मिळणंही अवघड असतं, अशा दुर्गम भागातली एक तरुणी भारतीय सेनेत दाखल झाली आहे. या तरुणीचा इथवरचा प्रवास थक्क करणारा आहे. शिल्पा चिकणे असं या तरुणीचं नाव आहे. आपल्या गावातली मुलगी देशसेवा करतेय, म्हणून गावकऱ्यांचा छाती अभिमाननाने भरुन आलीये. पाहुया या तरुणीची ही अभिमानास्पद बातमी. (satara javli taluka army women soldier shilpa chikne join indian army)
 
गावात असं दमदार स्वागत व्हायला तेवढंच दमदार कर्तृत्व लागतं. ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत शिल्पाची अशी गावात जोरदार एन्ट्री झाली. शिल्पा चिकणे,  शूरवीरांचा जिल्हा असलेल्या साताऱ्यातल्या गांजे गावातली तरुणी. शिल्पा देशसेवेसाठी आर्मीत रुजू झाली आहे.आसाम रायफलसारख्या बटालियनमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ती गावात परतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्यातलं गांजे हे दुर्गम भागातलं गाव. शिल्पाच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची. पण सैन्यात जायचंच हा तिचा ठाम निर्धार. दररोज 8 ते 10 किलोमीटरचा पायी प्रवास करत तिनं प्रशिक्षण पूर्ण केलं. आर्मीत जाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.


सैनिकांचा जिल्हा अशी साताऱ्याची ओळख आहे. आता या जिल्ह्यातल्या मुलीही शूरवीरांचा हा समृद्ध वारसा अभिमानानं मिरवतायत. शिल्पा जावळी तालुक्यातली आर्मीत रुजू होणारी पहिली मुलगी ठरलीय.


आर्मीत महिलांचा प्रवेश तसा नवा नसला तरी ग्रामीण भागातल्या महिलांचं प्रमाण जवळपास नसल्यासारखंच. मात्र शिल्पामुळे इतर मुलींनाही मोठं प्रोत्साहन मिळणार एकढं नक्की. त्यामुळे या धाकड मुलीचा साताऱ्यालाच काय अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान आहे.