सातारा : साताऱ्यात आज झालेल्या 10 हजार कोटी रुपयांच्या विकास कामाच्या उदघाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर कांदे फेकले. कांद्याला दिलेलं अनुदान मान्य नसून कांद्याला चांगला दर मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या महिलांनी गाजर दाखवत गाजर वाटप करुन भाजप सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्री सातारकरांना १० हजार कोटीचे गाजर दाखवत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र राज्य सरकारचं कोतुक केलं. खंबाटकी घाटात नव्यानं तयार करण्यात येणाऱ्या 3 मार्गिका जुळे बोगद्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. साताऱ्यातील सैनिक शाळेच्या मैदानावर हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारचे तोंडभरून कौतुक केलं आहे. सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले असून ते कार्यक्षम असल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. 


सरकारचा मराठा आरक्षणाचा निर्णय स्तुत्य असल्याचंही उदयनराजेंनी म्हटलं. उदयनराजेंच्या या कौतुकाला मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपल्या भाषणात उत्तर दिलं. छत्रपतींच्या शुभेच्छा सोबत आहेत आणि त्या यापुढेही कायम राहतील असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिंचनाच्या मुद्यावरून आघाडी सरकारवर तोंडसुख घेतलं. महाराष्ट्रात आठ हजार पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण केल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. तसंच सातारामधील भाग दुष्काळी राहणार नसल्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


याच कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकार आणि विशेषतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं. गडकरींच्या कामाच्या धडाक्यामुळे रस्ते कामांनी वेग घेतल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आहे.