अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; शेजारी सापडलेल्या मृत बिबट्यामुळे गूढ वाढलं
Satara Crime News : साताऱ्यातून महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला आहे. यासोबत तिच्याशेजारी एका मृत बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : सातारा शहरातून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन युवतीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडल्यामुळे मोठी खळबळ उडालीये. तर त्याच मृतदेहाशेजारी असलेल्या एका झाडावर मृत अवस्थेत बिबट्या देखील आढळून आल्याने घटनेचे गूढ वाढले आहे. मृत तरुणी ही महिन्याभरापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मृत मुलीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.
साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील दक्षिण दरवाजाच्या पायथ्याला एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला होता. यासोबत शेजारी असलेल्या झाडावर बिबट्याचा मृतदेह देखील आढळून आल्याने साताऱ्यात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार विष प्यायल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच यातील वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्यापासून काही अंतरावरील कड्यावरून एक महिन्यांपूर्वी संबंधित अल्पवयीन युवतीने उडी मारून आत्महत्या केली होती. मात्र बुधवारी अजिंक्यताराच्या पायथ्यावरून डोंगरात फिरण्यासाठी गेलेल्या काही जणांना संबंधित युवतीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती मिळताच घटनास्थळी सातारा शहर पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले.
या तपासादरम्यान संबंधित युवती ही एक महिन्यापूर्वी सातारा शहरातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र बिबट्याचा देखील त्याच ठिकाणी मृत्यू झाल्यामुळे संबंधित युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी आणि तिचा मृतदेह बिबट्याने खाल्ल्याने त्याचाही मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर या घटनेची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मृत मुलगी साताऱ्यातील असून गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता होती. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी अजिंक्यताऱ्यावरील दक्षिण दरवाजाच्या बाजूकडून जात असताना उग्र वास येत असल्याने लोकांनी जाऊन पाहिले. त्यावेळी त्यांना एका झाडाखाली कुजलेला मुलीचा मृतदेह आढळला. तर झाडावर बिबट्याचा मृतदेह आढळला. वन विभागाने बिबट्याचा मृतदेह झाडावरून खाली घेतल्यानंतर बिबट्याचे 7 ते 8 महिन्यांचे पिल्लू असल्याचे तपासात समोर आलं आहे.