जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् कुटुंब थेट रुग्णालयात पोहोचलं; बाप लेकाचा मृत्यू
Satara News : साताऱ्याच्या फलटणमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या जेवणानंतर आयुर्वेदिक काढा प्यायल्यानंतर कुटुंबातील तिघांना त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यातून (Satara News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुर्वेदिक काढा (Ayurvedic extract) प्यायल्याने साताऱ्यात पिता पुत्राचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्याच्या फलटणमध्ये (Phaltan) घडलाय. फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या पितापुत्रांचा आकस्मित मृत्यू झाला आहे. आयुर्वेदिक काढा प्यायल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच दोघांच्या मृत्यूचे कारण कळणार असल्याचे सांगितले गेले आहे.
फलटण शहरात गजानन चौक येथे राहणारे हनुमंतराव पोतेकर ( वय 55) आणि त्यांचा मुलगा अमित पोतेकर (वय 32 ) यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. जेवणानंतर कुटुंबातील सर्वांनी आयुर्वेदिक काढा प्यायला. पण काढा प्यायल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव, मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला. त्रास सुरु झाल्याने तिघांनाही रात्रीच फलटण शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचार सुरु असतानाच पहाटे हनुमंतराव पोतेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर पंधरा मिनिटांनीच मुलगा अमित पोतेकर याचेही निधन झाले. मात्र मुलीचा जीव वाचला आहे. मुलीच्या तब्येत सुधारणा झाली आहे. पण पिता पुत्राच्या मृत्यूने पोतेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोघांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याचे कारण समजू शकलेले नाही. दोघांचा मृत्यू काड्यातून झालेल्या विषबाधेमुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे या पिता पुत्राच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
पाणीपुरी खाल्ल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
नागपूरमध्ये पाणीपुरी खाणे एका विद्यार्थिनीच्या जीवावर बेतलं आहे. जम्मू कश्मीर येथून बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी नागपुरात आलेल्या 18 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शितल कुमार असं विद्यार्थिनीचे नाव आहे. मुलीचा मृत्यू पाणीपुरी खाल्ल्यामुळे झाला आहे. पाणीपुरीसाठी करण्यात आलेलं पाणी दुषित असल्याने मुलीला गॅस्ट्रोची लागण झाली होती. मात्र तिने वेळेत उपचार न घेतल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या घटनेत तिच्या दोन मैत्रिणी बचावल्या आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मैत्रिणीच्या मृत्यूमुळं त्या दोघींनाही जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळं यापुढं तुम्ही पाणीपुरी खाण्याआधी आजुबाजूला स्वच्छता आहे की नाही, हे नक्की तपासून पाहा. शक्यतो पावसाळ्यात पाणीपुरी किंवा रस्त्यावरचे कोणतेही खाद्यपदार्थ खाणं टाळा.