तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : बुधवारी रात्री भरधाव कारला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना साताऱ्यातील (Satara News) पारगाव खंडाळा (Khandala) येथे घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या कारची ट्रकला धडक (Satara Accident) बसल्याने हा मोठा अपघात झाला. या अपघातात महिलेसह एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शिरवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की कारचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता. स्थानिकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केल्याने मोठी जीवितहानी टळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय झालं?


सातारा-पुणे महामार्गावरील पारगाव परिसरात बुधवारी रात्री हा सर्व प्रकार घडला. पारगाव येथे रस्त्यालगत असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी एक ट्रकचालक थांबला होता. यावेळी ट्रकचालकाने त्याचा ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत 15 वर्षाच्या मुलासह एका महिलेचा मृत्यू झाला आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह कारच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. दरम्यान, चहा पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे वाहने उभी केल्याने वारंवार असे भीषण अपघाताचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.


दरम्यान, नाशिकच्या वणी - सापुतारा रस्त्यावर झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट रस्त्याच्या खाली उतरली आणि पलटली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुणींसह एका तरुणाचा समावेश आहे. अंजली राकेश सिंग, नोमान चौधरी व सृष्टी नरेश भगत अशी मृतांची नावे आहेत. तर अजय गौतम नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.