कोरोनाच्या लढाईमध्ये छत्री ठरतेय ढाल
हे कसं शक्य होतंय ते एकदा वाचाच....
सातारा : Coronavirus कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे उदभवलेली आव्हानात्मक परिस्थिती पाहता या धर्तीवर शक्य त्या सर्व परिने प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात येत आहेत. कोरोनाविरोधातील या लढाईमध्ये देशभरातील विविध राज्य त्यांच्या मार्गांनी काही उपाययोजना राबवत आहेत. तर, काही राज्यांकडून त्यांचं अनुकरण करण्यात येत आहे.
देशातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या आणि त्यानंतर कोरोनाच्या संकटाला बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या केरळ या राज्याची छत्री पॅटर्नचं हे असंच एक उदाहरण.
कोरोनाशी लढत असताना छत्रीचा प्रभावी वापर होऊ शकतो हे केरळमध्ये अधोरेखित झालं. ज्या आधारे आता छत्रीचा वापर करत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं यासाठी महाराष्ट्रात कऱ्हाडमध्ये पोलिसांनी छत्री रॅली काढल्याचं पाहायला मिळालं.
केरळचा छत्री पॅटर्न साताऱ्यात लागू
सहसा उन किंवा पावसापासून बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर केला जातो. असं असलं तरीही, त्यापलीकडे जात वैश्विक महामारी म्हणून साऱ्या विश्वासमोर संटक होऊन ठाकलेल्या कोरोनाला दूर सारण्यासाठीही ही छत्री मदतीची ठरत आहे. छत्रीच्या वापरामुळं अगदी सहजपणे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत असून, सार्वजनिक ठिकाणी ही बाब अधिक प्रभावीपणे पाहायला मिळत आहे. केरळमध्ये अंमलात आणण्यात आलेला हाच छत्री पॅटर्न साताऱ्यातही दिसून येत आहे.
वाचा : अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा घेणं आम्हाला शक्य नाही- उदय सामंत
कऱ्हाडमध्ये यासाठी पोलिसांकडूनच एक रॅली काढण्यात आली होती. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता आता छत्रीचा वापर करावाच असा आग्रह पोलीस यंत्रणेकडून करण्यात येत आहे. फक्त साताऱ्यातच नव्हे, तर आता राज्यात इतर सर्व ठिकाणीसुद्धा हा छत्री पॅटर्न फायद्याचा ठरु शकतो हे खरं.