धक्कादायक! अपघाताचा धसका, विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या
एक धक्कादायक बातमी. एका अपघातात एकाचा मृत्यू बघितल्याने मानसिक धक्क्यातून एका तरुण विद्यार्थाने आत्महत्या केली.
नागपूर : एक धक्कादायक बातमी. एका अपघातात एकाचा मृत्यू बघितल्याने मानसिक धक्क्यातून एका तरुण विद्यार्थाने आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचा आत्मा बोलावतोय, असा उल्लेख त्यानं आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत केलाय.
तुमच्या मुलांशी बोला. मुलांशी संवाद तुटू देऊ नका. हे सगळं सांगण्याची वारंवार वेळ येते कारण घडणाऱ्या धक्कादायक घटना. नागपुरातली अशीच एक घटना पालकांची झोप उडवणारी आहे.
सौरभ नागपूरकर.१८ वर्षांचा तरुण मुलगा. नागपूरच्या नामांकित खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. १४ ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमाराला सौरभटचे वडील त्याला बोलावण्यासाठी सौरभच्या खोलीत गेले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
बहिणीच्या ओढणीनं सौरभनं गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. धक्कादायक बाब समोर आली ती सौरभनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून. दोन महिन्यांपूर्वी सौरभच्या डोळ्यांसमोर एक अपघात झाला होता. या अपघातात सौरभच्या डोळ्यांदेखत एका मुलाचा मृत्यू झाला होता. मृत मुलगा सातत्यानं डोळ्यांसमोर येतो.
त्यामुळे महाविद्यालयात जाताना दोन वेळा अपघात झाल्याचंही सौरभनं चिठ्ठीत लिहिलंय. त्या मृत मुलाचा आत्मा बोलावत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख आहे.
सौरभच्या या चिठ्ठीमुळे पोलीसही चक्रावलेत. आत्महत्येच्या दोन दिवसांपूर्वी भीती वाटत असल्याचे सौरभनं त्याच्या मोठ्या बहिणीला सांगितलं होतं. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी हे गांभीर्यानं घेतलं नाही. सौरभने त्याचा सोबत घडत असलेल्या किंवा त्याला भास होणाऱ्या घटनेविषयी पालकांना, मित्रांना सांगितले असते तर कदाचित सौरभ वाचला असता. मात्र महाविद्यालयात जाणाऱ्या तरुण पिढीचा पालाकांसोबतचा संवाद दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय. पालकांनो, मुलांकडे नीट लक्ष द्या.