अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मिडीयावरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिष्टमंडळासह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मंगळवारी याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पथकाने सागर बर्वे नावाच्या तरुणाला अटक केली होती. सागर बर्वे याने शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले होते. यावेळी आणखी एका पोस्टसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी सौरभ पिंपळकर (Saurabh Pimpalkar) नावाच्या तरुणाविरोधातही तक्रार केल्याची माहिती समोर आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळे यांच्या तक्रारीनुसार शरद पवार धमकी प्रकरणात अमरावतीतील भाजपचा कार्यकर्ता सौरभ पिंपळकर असल्याची माहिती समोर आली होता. सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून पवारांना धमकी दिल्याचे म्हटले जात होते. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत होते. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सौरभ पिंपळकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच गाडगेनगर पोलिसांचे पथक त्‍याच्‍या शोधात होते.


त्यानंतर आता शरद पवार धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर अखेर 7 दिवसा नंतर मिडियासमोर आला आहे.  या संपूर्ण प्रकरणात माझा कुठल्याच प्रकारे हात नसून या प्रकरणात मला विनाकारण गोवण्यात आले असल्याचे भाजप कार्यकर्ता सौरभ पिंपळकर यांनी म्हटले आहे. शरद पवार यांचा दाभोळकर होईल या पोस्ट सोबत माझा संबंध नाही. मी त्याला रिट्विट केलं नाही. शेअर केले नाही. लाईक सुद्धा केले नाही. मात्र सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवलं व माझ्यावर आरोप केले. त्यामुळे मी आता सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सौरभने म्हटले आहे. 


"सुप्रिया सुळे यांनी जे माध्यमांमध्ये दाखवलं होतं की तुझा दाभोळकर होणार. या पोस्टसोबत माझा संबंध नाही. मी त्याला लाईक केले नाही, पोस्ट केले नाही, रिट्विट केले नाही किंवा शेअर केले नाही. मी ती पोस्ट आयुष्यात कधी बघितली सुद्धा नाही. मी औरंगजेबाबद्दल पोस्ट केली होती. औरंगजेब सुपारी खाऊन त्याचे तोंड वाकडे झाले आणि तो गेला आणि त्याची इतिहासात पुनरावृत्ती होणार. यामध्ये मी शरद पवार यांच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यांनी तुझा दाभोळकर होणार ही पोस्ट दाखवून प्रसारमाध्यमांवर माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी ती पोस्ट औरंगजेबाला उद्देषून लिहीली होती. याचा शरद पवार यांच्यासोबत कसा संबंध जोडून घेतला? मी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे. दोन दिवसात यासंदर्भातील कारवाई करेल," असे सौरभ पिंपळकर याने म्हटलं आहे.