COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : पारंपरिक पद्धतीच्या धान माळणीला लागणारे मजूर आणि त्यावर होणारा खर्च आता यांत्रिक युगात कमी झाला आहे. अवकाळी पावसाची धास्ती वाढली असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात आता हार्वेस्टरने मळणी सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. 


भंडारा जिल्ह्यात गत २५ दिवसापासून उन्हाळी धान कापणी बांधणी मळणीचा हंगाम जोमात आहे. अवकाळी पावसामुळे सर्वांचा हंगाम प्रभावित झाला. नित्याप्रमाणे मजूर टंचाईचा सामना सगळ्यांनाच करावा लागला. मात्र, यांत्रिक मळणी यंत्राने शेतकऱ्यांना आधार दिला असून वेळेची व पैशाची बचत शक्य झालेली आहे. मजुरांच्या हाताने कापणी बांधणीचे दर प्रति एकराला सुमारे तीन हजार रुपये आहे. मळणी ७० रुपये प्रति पोता असे दर आहेत. प्रति एकरात कापणी, बांधणी आणि मळणीचा खर्च चार हजार ६०० त पाच हजार रुपये आहे. यात जोखीम असून मजूर वेळेत मिळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. 


मात्र, यांत्रिक मळणी प्रती एकर केवळ दोन हजार ५०० एवढ्या दराने केले जात आहे. यात शेतकऱ्याला प्रती एकर दोन ते अडीच हजार रुपये एवढी बचत शक्य आहे. त्यातल्या त्यात घंटो का काम मिंटोमे होत असल्याने वेळेची बचत होत आहे. शासनसुद्धा यांत्रिक शेतीचा पुरस्कर्ता आहे. शासनाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकरीसुद्धा यांत्रिक होत आहे.


जिल्ह्यात उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. ७० टक्के हंगाम आटोपले असुन उर्वरित हंगाम हप्त्याभरात पार पडण्याची शक्यता आहे. हंगाम मळणी होऊन आधार केंद्राअभावी खासगी व्यापाऱ्याच्या आश्रयाने विकला गेला. प्रति क्विंटल ४५० रुपयांचा तोटा सहन करीत राजकीय लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती कमी पडल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाराला हंगाम विकला. हे भंडारा जिल्ह्याचे मोठे दुर्दैव म्हणायला हरकत नसावे. राज्यात व केंद्रात मोठा अधिकार प्राप्त असूनही लोकप्रतिनिधींनी वेळेत आधारभूत केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांचे सुमारे नुकसान झाले आहे.