महाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा
रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर भागात जोरदार पाऊस सुरू आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणीपातळी कमालीची वाढलीय. पुराचं पाणी महाड शहरात घुसलेय.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर भागात जोरदार पाऊस सुरू आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणीपातळी कमालीची वाढलीय. पुराचं पाणी महाड शहरात घुसलेय.
महाडच्या मच्छी मार्केट, दस्तुरी नाका इथे पाणी शिरलं आहे. महाड ते नातेखिंड दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. नगरपालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रायगडमध्ये काल संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर पहाटेपासून कमी झाला असला तरी महाड पोलादपूर तालुक्यात अधून मधून जोरदार सरी कोसळतायत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही रात्रभर पावसाचा जोर कायम होता. सिंधुदुर्गात संपूर्ण जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलीय.
रायगड जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. रात्री महाड, नागोठणे, रोहा, गावांना रात्री पुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र रात्री थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतल्याने धोका टळला. सावित्री, गांधारी, आंबा, कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत आल्या होत्या.