Bhujbal On Atharvashirsha Pathan: नवी मुंबईमधील कळंबोली येथे शनिवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 194 व्या जयंतीनिमित्त महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला माजी मंत्री तशीच विद्यमान आमदार छगन भुजबळ उपस्थित होते. श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाने आयोजित केलेल्या या सोहळ्यामध्ये बोलताना भुजबळ यांनी आपल्या भाषणातून खंत बोलून दाखवली. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी काही प्रश्नांना रोठठोक उत्तरंही दिली.


...ही आमची खंत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी, "आज सावित्रीबाईची आठवण नाही, ही आमची खंत आहे," असं म्हटलं. याचसंदर्भातून पुढे बोलताना, "आज दगडूशेठ हलवाई गणपतीला महिला अथर्वशीर्ष म्हणतात पण हे म्हणायला, लिहायला शिकवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करत नाहीत. त्यांना नमन करत नाही, ही मोठी खंत आहे," असंही भुजबळ म्हणाले.  


फुलेंनी पहिली शाळा ब्राह्मणांच्या...


"सावित्रीबाई फुले यांचे कार्य खूप मोठे आहे, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे ब्राम्हण विरोधी नव्हते. ते ब्राह्मण्यवाद आणि अंधश्रद्धेच्या विरोधात होते," असंही भुजबळ म्हणाले. फुले दांपत्याने, "पहिली शाळा ब्राह्मणांच्या वाड्यात सुरू केली," अशी आठवण भुजबळ यांनी उपस्थितांना करुन दिली. 


पवार कुटुंबाने, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावे


कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींबरोबर बोलताना छगन भुजबळांना शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, "पवार कुटुंबाने एकत्र यावे. आमच्या शुभेच्छा आहेत. ठाकरे कुटुंब एकत्र यावेत आम्हाला आनंद आहे," असं उत्तर दिलं. 


तो फोन कॉल अन् धनंजय मुंडेंऐवजी मंत्री होण्यासंदर्भातही स्पष्टच बोलले


छगन भुजबळ यांना सुनील तटकरेंनी फोन केला होता का यासंदर्भात विचारण्यात आला. या प्रश्नावर भुजबळांनी, "तटकरे चा मला काही फोन आला नाही. मी याबद्दल मीडियामधूनच ऐकत आहे," असं उत्तर दिलं. पत्रकारांनी त्यांना नाराजीवरुन पुन्हा एकदा छेडलं असता भुजबळांनी, "मी नाराज आहे, नाराज आहे हे असं रोज सांगू का?" असा सवाल पत्रकारांना केला. तसेच धनंजय मुंडेंच्या जागी मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासंदर्भात भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. "धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद मला नको. अशी इच्छा माझी अजिबात नाही. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्याबाबत अजित पवार निर्णय घेतील," असं म्हणाले. मागील काही आठवड्यांपासून धनंजय मुंडेवर सातत्याने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन आरोप होत असल्याने त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा असल्याने यावरुन प्रश्न विचारण्यात आलेला.