हिजाबचा वाद हिंदू राष्ट्रापर्यंत, हिजाबच्या आंदोलनात SAY NO TO HINDU RASHTRA चे पोस्टर्स
मालेगावात अजीज कल्लू स्टेडीयम येथे जमियत उलेमा संघटनेतर्फे मुस्लिम महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं
मुंबई : हिजाबचा वाद आता थेट हिंदू राष्ट्रापर्यंत येऊन पोहचला आहे. हिजाबच्या समर्थनात मुंबईत ११ फेब्रुवारीला निदर्शनं करण्यात येणार आहेत. त्यासाठी जे पोस्टर तयार करण्यात आले आहेत त्यावर SAY NO TO HINDU RASHTRA असा वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला आहे.
हे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झालंय. त्यामुळे आता शाळा आणि कॉलेजेसमधल्या गणवेशाच्या वादाला हिजाबच्या नावाखाली हिंदू मुस्लीमचा धार्मिक रंगही देण्यात येत असल्याचं यावरून उघड होतं आहे.
मालेगावमध्ये हिजाबचं शक्तिप्रदर्शन
कर्नाटकमध्ये हिजाबवरून असलेल्या वादाचे मालेगावमध्ये तीव्र पडसाद उमटतायत. अजीज कल्लू स्टेडीयम येथे जमियत उलेमा संघटनेतर्फे मुस्लिम महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो बुरखाधारी महिला या मेळाव्याला उपस्थित होत्या. तर हिजाबच्या समर्थनार्थ उद्या शुक्रवारी हिजाब दिवस पाळण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातल्या सर्व महिला बुरखा परिधान करून कर्नाटक सरकारचा निषेध करणार आहेत.
दरम्यान, मुस्कान खान या विद्यार्थीनीने दाखवलेल्या धैर्याबद्दल तिच्या सन्मानासाठी मालेगाव महापालिकेच्या उर्दू घरला मुस्कानचं नाव दिलं जाणार आहे. तसा ठराव महासभेत केला जाणार आहे. महापौर ताहेरा शेख यांनी ही घोषणा केली आहे.
पुण्यातही उमटले पडसाद
कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद पुण्यात उमटले. हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. महात्मा फुले वाड्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं.