मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह विधान भवनातील पत्रकार कक्ष गाठले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थसंकल्पाची कॉपी मिळण्यासाठी पत्रकार कक्षात एकच गर्दी झालेली. त्यातच ही नेते मंडळी अचानक दाखल झाल्याने एकच धावपळ उडाली. मंत्री जिथे जातील तिथं त्यांचा लवाजमा सोबत असतोच. त्यात मिलींद नार्वेकर म्हणजे मुख्यमंत्र्यांची सावलीच. ते आले नसते तर नवलच.  


सगळे नेते खुर्च्यांवर स्थानापन्न झाले. तर, पत्रकारांच्या एक दोन खुर्च्या खाली होत्या. ती संधी साधून मिलिंद नार्वेकरांनी एक खुर्ची आपल्या ताब्यात घेतली. इथं बसायला जरा बरं वाटतं. पत्रकारांच्या खुर्चीत बसलो काही प्रश्न विचारले तर चालतील असं हसत म्हटलं.


मुख्यमंत्री यांनी अजितदादा यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं कोतुक केलं आणि मग माईकचा ताबा अजितदादांनी घेतला. अर्थसंकल्पातील एक एक खुबी सांगत पत्रकारांच्या प्रश्नाला ते उत्तर देऊ लागले. तर इकडे मिलींद नार्वेकर हे अजित दादांचे गुणगान गाऊ लागले.


'दादांचा सगळ्याच क्षेत्रात तगडा अभ्यास आहे. 'दादा खूपच हुशार आहेत', असं ते सांगू लागले. पत्रकारांच्या प्रश्नांवर अजितदादांनीं टाकलेली गुगली यावर तर नार्वेकर दिलखुलास हसत होते. विरोधकांवर चिमटे काढण्याच्या दादास्टाइलवर नार्वेकर भलतेच फिदा झालेले दिसले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी पडल्यापासून विरोधकांच्या तोफेसमोर उपमुख्यमंत्री अजितदादा सामोरे जात आहेत. नव्हे ते त्यांना पुरून उरत आहेत. आता मुख्यमंत्री पुन्हा सक्षमतेने कामकाज पाहू लागले आहेत, सांभाळू लागले आहेत. सरकारवरील, मुख्यमंत्र्यांवरील संकटाच्या काळातही अजित पवार नावाची "पॉवर" असल्यामुळेच ताकद मिळत असल्याचं नार्वेकरांनी नकळत अधोरेखित केलं.