मेट्रो पिलरवर साकारला पोळ्याच्या देखावा
आकर्षणाचे केंद्र ठरतेय अनोखी कलाकृती
नागपूर- महामेट्रो नागपूर शहराचा इतिहास आणि परंपरा विविध मार्गाने साकारण्याचा प्रयत्न करत आहे. नागपूर शहराचा सौंदर्यात मेट्रोमुळे भर पडली आहे. त्यात आता अजून एक नवी कलाकृती सौंदर्यात वाढ करतेय . महामेट्रोने कॉटन मार्केट मेट्रो स्टेशन जवळील एका पिल्लर वर पोळ्याचे दृश्य साकारले आहे.
पोळा हा सण मोठ्या प्रमाणात सर्वत्र आणि विशेषता ग्रामीण भागात मोठ्या जोमात साजरा होत असला तरीही शहराच्या कॉटन मार्केट परिसरात पोळा साजरा करण्याचा जुना इतिहास आहे.या भागात मोठा आणि तान्हा पोळा साजरा होतो.ग्रामीण भागातून अनेक शेतकरी येथे बाजारात येत असतात. काळाच्या ओघात हे सण साजरे होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी या भागाची ओळख मात्र आजही कायम आहे. महामेट्रोने हेच अचूक हेरत कॉटन मार्केट परिसरातील पिल्लरवर या सणाचे दृश्य साकारण्याचा निर्णय घेतला.विनोद इंदुरकर यांनी लोखंड आणि इतर तत्सम साहित्याच्या माध्यमाने तीन महिन्याचा परिश्रमानंतर ही कलाकृती सादर करत पोळ्याचे दृश्य साकारले आहे.
महत्वाचे म्हणजे या कलाकृतीवर अनेक वर्ष वातावरणाचा कुठलाच परिणाम होणार नाही.शिवाय पिलरच्या चारी बाजूला याच विषयाला अनुसरून चार विविध दृश्य साकारण्यात आली आहे. यापैकी एक. एका बाजूला लहान मुलांच्या तान्हा पोळाचे दृश्य साकारले आहे. एकूण 24 बाय 9 फूट अशी प्रत्येक बाजूच्या दृश्याची लांबी- रुंदी आहे. ठराविक साहित्याच्या माध्यमाने याची निर्मिती झाल्याने या कलाकृतीवर अनेक वर्ष वातावरणाचा कुठलाही परिणाम होणार नाही.
महामेट्रोने शहरात विविध अनोखे प्रयोग केले आहे. मेट्रो स्टेशनच्या आधुनिक डिझाईन्स पासून तर व्हर्टीकल गार्डनची संकल्पना राबवली आहे. याबरोबर मेट्रोस्टेशन वर वैविध्यपूर्ण कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेतात. शहरात विविध ठिकाणी पिलरवर देखील वैशिष्ट्यपूर्ण आणि मनमोहक दृश्य रेखाटण्यात आली आहे.