विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण :  कल्याणमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढल्यामुळं पालकांवर शाळेसमोर आंदोलन करण्याची वेळ आली.  फी न दिल्याच्या कारणावरून डीएसडी शाळेनं दोन विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलून दिलं. शिक्षणमंत्री विनोद तावडे कल्याणमध्ये असतानाच ही अशोभनिय घटना घडली. शिक्षणमंत्र्यांनी कारवाईचा इशारा देऊनही शाळेची मुजोरी कायम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेच्या पहिल्याच विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी उत्साहीत असताना कल्याणमधल्या मुजोर डीएसडी शाळेनं दोन विद्यार्थ्यांना शाळा बाहेरचा रस्ता दाखवला. पालकांनी फी न भरल्याचं कारण देत गौरीपाडामधल्या डीएसडी शाळेनं दोन विद्यार्थ्यांना चक्क वर्गातून बाहेर घालवलं. 


विशेष म्हणजे शिक्षणमंत्री कल्याणमध्येच असताना हा धक्कादायक प्रकार घडला. शाळेनं अचानक पाच हजार फी वाढवल्यामुळं पालकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळं अनेकांचे निकाल रोखून धरण्यात आले होते. त्यानंतर ज्या पालकांनी फी भरली नाही त्या विद्यार्थ्यांना प्रवेशच नाकारण्यात आला. त्यामुळे पालकांवर पहिल्याच दिवशी शाळेसमोर आंदोलन करण्याची वेळ आली. संतप्त पालकांनी शाळेच्या गेटसमोर जोरदार घोषणाबाजी केली. 


पीडित पालकांनी माध्यमांकडे समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असता शाळा प्रशासनानं मुजोरीची परिसीमा गाठत थेट पोलिसात तक्रार केली. झी २४ तासनं शिक्षणमंत्री विनोद तावडेंना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी शाळेवर कारवाईचा इशारा दिला. तसंच पालकांविरोधात तक्रार न घेण्याची सूचना पोलिसांना केली. 


डीएसडी शाळेच्या प्रशासनानं मात्र आपल्या कृत्याचं समर्थन करत शिक्षणमंत्र्यांच्या  आदेशालाच हरताळ फासलं. 


शाळेनं आपली मुजोरी कायम ठेवत फी भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नसल्याची भूमिका घेतलीय. शिक्षणमंत्र्यांच्या आदेशालाही न जुमानणा-या या शाळेवर कडक कारवाई होणार की या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागणार याकडे लक्ष लागलं आहे.