नांदेड हादरलं! स्कूल व्हॅनमध्ये अल्पवयीन मुलीबरोबर ड्रायव्हरचे अश्लील चाळे; Video Viral झाल्यावर अटक
School Van Driver Molest Minor Girl In Nanded: या प्रकरणाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची दखल घेत कारवाई केली आहे. या प्रकरणासंदर्भातील माहिती पोलिसांनीच दिली आहे.
School Van Driver Molest Minor Girl In Nanded: स्कूल व्हॅनमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थीनीबरोबर चालकानेच अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक व्हिडीओ नांदेडमधून समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. स्कूल व्हॅनमध्ये हा घाणेरडा प्रकार सुरु असताना काही तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम रेकॉर्ड केला. सदर व्हिडीओ पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी अवघ्या दीड तासामध्ये अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
निर्जनस्थळी उभी होती गाडी
मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आणि त्यानंतर तो काही तासांमध्ये व्हायरल झाला. नांदेड शहरातील कॅनॉल रोडवर अनेक नामांकित शाळा आहेत. याच रोडवर एका मैदानावर ही स्कूल व्हॅन उभी होती. ही व्हॅन मुख्य रस्त्यापासून दूरवर निर्जनस्थळी उभी करण्यात आली होती. एका दुचाकी चालकाला शंका आल्याने तो दुचाकीवरुन व्हॅनकडे गेला. या तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डींग सुरु केले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी त्या ड्रायव्हरच्या मांडीवर झोपलेल्याचं दिसलं. आपला व्हिडिओ काढत असल्याचे समजताच मुलगी उठली.
जाब विचारला असता आरोपीने पळ काढला
व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने त्या ड्रायव्हरला जाब विचारला. ड्रायव्हरला त्याचे नाव विचारले असता त्याने सुरुवातीला आपले नाव वेगळे सांगितले आणि पुन्हा आडनाव विचारले असता नाव वेगळे सांगितले. निर्जनस्थळी मुलीसोबत काय करत आहे आहेस? असं विचारलं असता ड्रायव्हरने घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यांनतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपी ड्रायव्हरला ताब्यात घेतले. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी ही 16 ते 18 वर्षांची असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणाला वेगळं वळण मिळू नये आणि तणाव वाढू नये यासंदर्भात पोलीस विशेष काळजी घेताना दिसत आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांनी दिली आहे.
मुलांना शिकवण गरजेची
हल्ली शाळकरी मुलांबरोबर असे प्रकार अनेकदा घडत असल्याचं समोर आल्याने बऱ्याच शाळांमध्ये मुलांना गुड टच, बॅड टच यासारख्या गोष्टी अगदी लहान शिशूपासून शिकवल्या जातात. मुलांना शाळेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबरोबरच पालकांकडूनही वेळोवेळी यासंदर्भातील विचारणा होणं गरजेचं असतं असं सांगितलं जातं. मुलांच्या वागण्यामध्ये बदल झाल्याचं जाणवल्यास तातडीने संबंधित तज्ज्ञांची मदत घ्यावी, असा सल्ला दिला जातो.