अमर काणे, झी मीडिया नागपूर: कोरोना, डेंग्यूपाठोपाठ राज्यात आता स्क्रब टायफसनं डोकं वर काढलं आहे. शेतकरी तसच मजूर वर्गाला स्क्रब टायफस होण्याचा धोका अधिक असल्यानं चिंता वाढली आहे. कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिस-या लाटेचं वादळ घोंगावत असतानाच राज्यात स्क्रब टायफसनं डोकं वर काढलंय. विदर्भात स्क्रब टायफसचे चार रूग्ण आढळून आले आहेत. यातले तीन रूग्ण नागपुरातले आहेत तर 1 रूग्ण गोंदियाचा आहे. 2018 मध्ये याच स्क्रब टायफसनं 30 हून अधिक जणांचा बळी घेतला होता. 


चिगर माईट्समधील ओरिएन्शिनया सुसुमागिया जंतूनं मानवी शरीरात प्रवेश केल्यानं स्क्रब टायफसची लागण होते. हे माईट्स उंदराच्या शरीरावर चिकटून राहतात. त्याच्या रक्तावर वाढतात. पावसाळ्यात उंदीर बिळातून बाहेर येतात. त्यामुळे हे माईट्स उंच गवत, शेतात किंवा झाडी झुडपात पसरतात. या जीवाणूच्या संपर्कात जी व्यक्त येते त्याच्या त्वचेतून हा जंतू शरीरात प्रवेश करतो.


काय आहेत स्क्रब टायफसची लक्षणं


-ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कोरडा खोकला, न्युमोनिया सदृश्य आजार ही या आजाराची लक्षणं आहेत. 
-चिगर म्हणजेच किटक चावल्यानं खाज येते आणि अंगावर चट्टे येतात
-दंश झालेल्या ठिकाणी जखम होऊन खपली येते. 


शेतात काम करणा-यांना तसच जंगलात काम करणा-या मजूरांना स्क्रब टायफस होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे आजाराचा धोका टाळायचा असेल तर काळजी घेऊन काम करा. हातमोजे, गमबूट अशा साहित्याचा वापर करा. रोगाशी जराशी जरी लक्षणं आढळली तरी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.