प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर सध्या विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावलीय. पर्यटनाचा हंगाम नसला तरी युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे समुद्र किनारे फुलून गेलेत. दरवर्षी युरोपात कडाक्याची थंडी पडल्यावर हे परदेशी पाहुणे लाखोंच्या संख्येनं रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर दाखल होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणच्या किनाऱ्यांवर युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे किनारा अगदी गजबजून गेलाय. सकाळी तुम्ही रत्नागिरीच्या कोणत्याही किनाऱ्यावर गेलात तर समुद्र किनारे निर्मनुष्य असतील... मात्र, कोकणातील हे लांबच लांब पसरलेले किनारे हजारो पक्षांनी भरून गेलेत. गेल्या अनेक वर्षापासून दक्षिण ग्रीनलंड आणि युरोपातील हे सीगल्स पक्षी न चुकता कोकणात येतात. 


खरं तर कोकणातील किनाऱ्यांवर जिथे भक्ष्य लगेच सापडेल अशा ठिकाणी या सीगल्स पक्षांचा थवा उतरतो. सकाळी लवकर समुद्र किनारी दिसणारे हे पाहुणे दुपारच्या वेळी एकाच वेळी थव्याने उडत खोल समुद्रात जातात... आणि पाण्यावर विहार करत आपले भक्ष्य शोधतात... खोल समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या बोटी मागे उडतात... किनाऱ्यावर एकाच वेळी हजारो पक्षी एकाच वेळी असले तरी त्यांच्यात एक ताळमेळ पाहायला मिळतो. एका क्षणात एकाच वेळी हे हजारो पक्षी एकदम आकाशात झेपावतात.


कोकणच्या किनाऱ्यांवर सध्या पर्यटकांची गर्दी नाही. मात्र, हजारोंच्या संख्येनं आलेले हे सीगल्स पुढील काही दिवस कोकणचा पाहुणचार घेतील. रत्नागिरीतील किनाऱ्यांजवळ प्रदूषण करणाऱ्या प्रोजेक्टचा विळखा वाढतोय. त्यात दूषित रसायनयुक्त पाण्यामुळे  जैव-विविधतेला सध्या धोका निर्माण झालाय. त्यामुळेच हे प्रदूषण थांबवायला हवं...