जावेद मुलाणी, झी २४ तास, मुंबई : उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी  इंदापूरला देण्याच्या  निर्णयामुळे आक्रमक झालेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलकांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या गोविंद निवासस्थानासमोर येत आपली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले . दोन जणांना ताब्यात घेतले असले तरी आणखी 35 जण या आंदोलनासाठी बारामतीत दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवास स्थानासमोर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उजनीतून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा मोहोळ पंढरपूर तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले होते. 


सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि नेतेमंडळींच्या त्यामुळे अखेर हा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मागे घेत असल्याचे जाहीर केले ,परंतु तसा कोणताही शासकीय आदेश अद्याप मिळालेला नाही त्यामुळे या विषयाची धग अद्याप कायम आहे. 


दुसरीकडे पाणी देण्याचा निर्णय रद्द झालेले इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत .रास्तारोको, मुंडन ,जलसमाधी, बोंबाबोंब, अर्धनग्न होवून आंदोलन ,जागरण गोंधळ , दंडवत असे आंदोलने इंदापूर तालुक्यात दररोज सुरू आहेत. 


दरम्यान, बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकरी खासदार शरद पवार यांच्या गोविंद बाग निवासस्थानासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे येथील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 


पोलिसांनी दोघा शेतकऱ्यांना तेथे दाखल होण्यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. बारामती - निरा रस्त्यावर वाहनचालकांची पोलिसांकडून तपासणी सुरू केली आहे. गोविंद बागेसमोर पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे.