हिंगोली : जिल्ह्यातील ताकतोडा गावाने गाव विकणे आहे. या मथळ्याखाली आंदोलन सुरु केले आहे. सहाव्या दिवशी गावात आंदोलन सुरुच आहे. कालपासून १५ शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तर आज १५ ते २० तरुणांनी मुंडन करून शासनाचा निषेध केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भीषण दुष्काळ असताना मागच्या वर्षी गावातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, कर्जमाफीचा लाभ झाला नाही, बँका पीक कर्ज देत नाहीत त्यामुळे खासगी बँकातून फायनान्स काढून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्या पैश्यासाठी फायनान्सवाले तगादा लावत असल्याने आणि गावात प्यायला पाणी नाही. पीक पाण्याअभावी कोमेजून जात आहेत, अशा परिस्थितीत गावाचे काय करायचे म्हणत ताकतोडा ग्रामस्थांनी गावच विकायला काढलं आहे.


सहा दिवस उलटून ही प्रशासनाने काही ठोस भूमिका घेत नसल्याने गावाचे विविध पद्धतीने आंदोलन सुरू आहे. विशेषबाब म्हणजे गावातील शाळेसह सर्व शासकीय कार्यालये बंद ठेऊन उपोषण सुरु असल्याने विद्यार्थ्यांचे ही शैक्षणिक नुकसान होत आहे. वेळेत आंदोलनाची दखल न घेतल्यास परिणामास शासन जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी शासनाला दिला आहे.