मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन
मराठी मनोरंजन विश्वामधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज निधन झालं आहे.
Suhasini Deshpande : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज निधन झालं आहे. आज त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहे.
अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी मराठी सिनेमाच्या माध्यामातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 70 वर्षात त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे सोशल मीडियावर लाखो चाहते होते. आज त्याच्या जाण्याने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सुहासिनी देशपांडे यांचे गाजलेले चित्रपट
अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे खूप चित्रपट गाजले. ज्यामध्ये देवकीनंदन गोपाला, गड जेजुरी, आम्ही दोघे राजा राणी, वारसा लक्ष्मीचा, पुढचं पाऊल, काळूबाईच्या नावानं चांगभलं, बाईसाहेब, आज झाले मुक्त मी, धग, माहरेचा आहेर आणि मानाचं कुंकू मानाचा मुजरा अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. सुहासिनी यांचा 'सिंघम' हा शेवटचा हिंदी चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी काजल अग्रवालच्या काव्याच्या आजीची भूमिका साकारली होती.
त्यासोबत त्यांनी नाटकांचे देखील हजारो प्रयोग केले आहेत. सासूबाईंचं असंच असंत, लग्नाची बेडी, राजकारण गेलं चुलीत, चिरंजीव आईस, कथा अकलेच्या कांद्याची आणि बेल भंडार.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिवावर उद्या बुधवारी (28 ऑगस्ट) रोजी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.