अहमदनगर : राज्य सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या (Wine Seeling) निर्णायवरुन चांगलंच राजकारण पेटलं आहे. या वाईन विक्रीच्या निर्णयावरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी कडाडून टीका केली. तसेच मला तुमच्या राज्यात मला जगायचंय नाहीय, असं हताश वक्तव्य अण्णांनी केलं. ते त्यांच्या अहमदनगरमधील राळेगणसिद्धी गावात बोलत होते. तसेच यावेळेस त्यांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला.  (senior social worker anna hazare decided to fasting cancel against wine selling in super market after gram sabha at ralegansiddhi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अण्णा काय म्हणाले? 


"आज महाराष्ट्रामध्ये दारु कमी आहे का? बिअरबार, परमीट रुम पण आहेत. वाईन शॉपही उघडलेले आहेत. इथे वाईन मिळते ना? मग यानंतरही तुम्हाला दुकानात वाईन का ठेवायचीये", असा सवाल अण्णांनी सरकारला विचारला.  



सर्वांना व्यासनाधीन करायचंय? 


"सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवून तुम्हाला काय सर्वांना व्यासनाधीन करायचंय? म्हणजे आपल्याला जे साध्य करायचंय ते साधायचं. लोकं व्यसनाधीन झाले की आपल्याला जे साधायचंय ते साधता येतं. असा  सरकारचा डाव आहे का", अशी शंका अण्णांनी राज्य सरकारच्या या वाईन विक्रीच्या निर्णयावरुन घेतली. 


"व्यसनाने लोकं बर्बाद झाले. युवा शक्ती ही आमचती राष्ट्रशक्ती आहे. ही बालकं आमची संपत्ती आहे. बालकं वाईनच्या आहारी गेली तर काय होणार?  मला फक्त राळेगणसिद्धीसाठी नाही, तर महाराष्ट्रासाठी वाईट वाटतं, की या निर्णायमुळे बालकांवर, मुलींवर महिलांवर अन्याय आणि अत्याचार होतील", अशी भितीही अण्णांनी व्यक्त केली. 


"या सर्व प्रकरणी मी सरकारला निरोप पाठवला. त्यानुसार सरकारकडून 4-5 जण निरोप घेऊन आले. मी सर्व ऐकलं. त्यांच्या निरोपाला मी उत्तर म्हणून मी एकच सांगितलं की, तुमचं सर्व मी ऐकलंय. आता माझा एक निरोप सरकारला सांगा. तुमच्या राज्यात माझी जगायची इच्छा राहिली नाही", अशी उद्विग्नता अण्णांनी मांडली. 


उपोषणाचा निर्णय मागे


अण्णांनी वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयावरुन उपोषण करायचं की नाही, यासाठी गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन केलं गेलं होतं. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी अण्णांची भेट घेत त्यांची मनधरणी केली. अण्णांना यासंबंधीत सर्व नियम सांगितले. तसेच निर्णयाच्या अंमलबजावणी आधी प्रतिक्रिया मागवण्यात येणार असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. 


यावर अण्णा काहीसे समाधानी झाले. मात्र उपोषणाचा निर्णय हा ग्रामस्थ ग्रामसभेत घेतील, असंच ठरलं. त्यानुसार ग्रामसभेत अण्णांनी उपोषण करावं की नाही, याबाबतचा ठराव मांडण्यात आला.  


या ठरावात राज्य सरकारने वाईन विक्रीच्या निर्णयाचा फेरविचार करावा. तसेच अण्णांनी उपोषण करु नयेत, असं ठरलं. त्यानुसार अण्णांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला.