साताऱ्यात सीरिअल किलिंगचा धक्कादायक प्रकार, पत्नी आणि प्रेयसीची हत्या करुन शेतात पुरलं
देशभर गाजलेल्या सीरियल किलर डॉक्टर संतोष पोळनं केलेल्या हत्याकांडासारखाच धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात उघड
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : देशभर गाजलेल्या सीरियल किलर डॉक्टर संतोष पोळनं केलेल्या हत्याकांडासारखाच आणखी एक धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात उघड झाला आहे. साताऱ्यातील संतोष पोळनं जी मोडस ऑपरेंडी वापरून अनेक महिलांचे खून केले होते. तसाच धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात उघडकीस आला आहे.
वाई तालुक्यातील व्याजवाडी गावात राहणाऱ्या नितीन गोळे या आरोपीने 2019 मध्ये एक आणि आता 3 ऑगस्टला एक असे दोन खून केल्याचं समोर आलं आहे .पत्नी आणि प्रेयसी या दोघींचे खून इतर पुरुषांशी असलेल्या अनैतिक संबंधातून झाल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.
प्रेयसीआधी केला होता आणखी एक खून
3 ऑगस्ट ला प्रेयसी संध्या शिंदे हिचा खून करून नितीन गोळे यानं तिचा मुतदेह शेतात लपावला. या खूनाचा भुईंज पोलिसांनी छडा लावल्या नंतर पोलीस
तपासात धक्कादायक माहिती समोर आली. 2019 मध्ये नितीन गोळेने पत्नी मनीषा गोळे हीचा देखील खून करून मृतदेह शेताच्या बाजूला असलेल्या ओढ्यात पुरला असल्याचं समोर आलं.
लहान मुलांसमोरच केला पत्नीचा खून
धक्कादायक बाब म्हणजे पत्नीचा खून करते वेळी त्याची दोन लहान मुले तिथेच होती. आपल्या लहान मुलांच्या समोरच या नराधमाने पत्नीचा खून केल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे. नितीनने पत्नी मनीषा गोळेचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता, त्या ठिकाणी जाऊन खोदकाम करत पुरलेल्या मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढला.
कोण आहे नितीन गोळे
नितीन गोळे साताऱ्यातील वाई तालुक्यातील व्याजवाडी गावात राहणारा आहे. नितीन आर्मी मध्ये भरती झाला होता. पण अवघ्या दोन महिन्यातच तो तिथून पळून आला आणि सध्या शेती करत होता.
नितीन गोळेने सध्या दोन खुनाची कबुली दिली आहे. अजून काही खून केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत