हिंगोली : हिंगोलीतल्या वसमत इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला आहे. जयपूरवरुन या पुतळ्याचं शहरात आगमन होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुतळ्याचं स्वागत केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पण यावेळी त्यांच्याकडून एक गंभीर चूक झाली. आमदार राजू नवघरे यांनी अश्वावर उभं राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकाराचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकारानंतर आमदार राजू नवघरे यांनी जाहीर माफी मागितली आहे. 


काय म्हणाले राजू नवघरे?


मी तिथे पुष्पगुच्छ वाहिली आणि खाली आलो, माझ्यासोबत सुनील काळे होते, मुंदडासाहेब होते, फक्त माझ्या एकट्याचा पाय तिथे कुठेतरी लावलेला दाखवला जात आहे. मी कुठे चुकलो असेन तर माफी मागतो. माझी चूक नाहीए असं मला वाटतंय, पण छत्रपती शिवाजी महाराजांवर आम्ही प्रेम करणारी माणसं आहोत, माझ्या सारखा एखादा कार्यकर्ता आमदार झाला की त्याच्याविरुद्ध सर्वच लोकं पेटून उठयाचं काम करतात. मी एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे. असं सांगत राजू नवघरे यांनी आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप केला. 



अतिशय संतापजनक प्रकार


राजू नवधरे यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्या मोठयाप्रमाणावर टीका केली जात आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राजू नवघरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर कोणत्याही शिवप्रेमीला संताप आल्याशिवाय राहणार नाही. सत्तांध झालेल्या आमदाराचं हे काम आहे, सत्ता किती डोक्यात घुसली आहे, की आपलं दैवत आहे, त्यांच्या अंगावर पाय देऊन तुम्ही उभं राहताय आणि अवमान करताय, याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठची असू शकत नाही, यामुळे जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे, त्यांनी संपूर्ण राज्याची आणि शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे, असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.