पुणे : देशाला कोरोनाची कोव्हिशील्ड लस देणाऱ्या सीरम संस्थेच्या 6 व्या मजल्यावर गुरुवारी आग लागली. काही क्षणांत या आगीनं रौद्र रुप धारण केलं होतं. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून आगीवर अखेर नियंत्रण मिळवलं. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर मृत्यूच्या मगरमिठीतून आपला जीव वाचवण्यासाठी एका तरुणानं धडपड केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीरममधील आग वेगानं पसरत असतानाच अश्विननं आपला जीव वाचवण्यासाठी थेट सहाव्या मजल्यावरून खाली उडी घेतली. सीरम इन्स्टिट्युट इमारतीला लागलेल्या आगीतून बचावलेल्या अश्विनकुमार पांडेचा भाऊदेखील या आगीत मृत्यू पावला. अश्विनही मृत्यूच्या मगरमिठीत सापडला होता. मात्र स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी त्यानं थेट वरच्या मजल्यावरून खाली उडी घेतली. भाऊ आगीत होरपळून गेला पण अश्विनचा जीव वाचला.


पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. तब्बल 3 तासांनंतर ही आग नियंत्रणात आली. आग लागलेल्या इमारतीतून सर्व 6 जणांना सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली.


या इमारतीत कोणत्याही प्रकारचं उत्पादन सुरू नसल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्यामुळे कोविशील्ड लसींना कोणताही धोका पोहचला नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं.


या दुर्घटनेबाबत कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महापालिका आयुक्तांशी संपर्क साधला आणि आगीबाबत संपूर्ण माहिती घेतली. 5 जणांपैकी 2 जण पुण्यातील रहिवासी आहेत. मृतांपैकी 3 जण यूपी, बिहारचे नागरिक आहेत. या आगीत होरपऴून मृत्यू पावलेल्या 5 निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.