औरंगाबाद : घराघरात पडून असणाऱ्या अडगळीच्या वस्तू आपण कधी ना कधी भंगारात काढतो. अशा भंगारात मिळणाऱ्या वस्तू विकून त्या भंगारवाल्याची कमाई किती होत असेल? पण, अधिकची कमाई मिळविण्यासाठी औरंगाबादच्या भंगारवाल्याने चक्क सरकारलाच गंडा घालण्याची शक्कल लढविली खरी पण ती त्याच्याच अंगलट आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता प्रत्यक्षात हजारापेक्षा अधिक बनावट बिले तयार केली गेली. या बिलांमुळे जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) द्वारे सरकारला 200 कोटीहून अधिकचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.  


केंद्रीय जीएसटी विभागाने याप्रकरणी दिल्लीतील व्यापारी समीर मलिक याला अटक केली होती. समीर मालिकेने शहरातील नायगाव येथे सनराइज् एन्टरप्राइझेस या नावाने व्यवसाय सुरु केला होता. त्यासाठी त्यांनी बोगस नोंदणी केली होती.


मलिक याने साठ कोटीचे बिल काढत 10 कोटींची रक्कम शहरातील 15 ते 16 भंगार विक्रेत्यांना दिल्याचे दाखविले होते. या व्यवहाराचा संशय केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना आला. त्यांनी समीर मलिक याला औरंगाबादमध्ये बोलवले आणि विमानतळावरच त्याला अटक केली.


त्यानंतर या घोटाळ्याची पाळंमुळं शोधण्याचे काम सुरू झालं. या घोटाळ्यात राज्यातील अनेक व्यापारी सहभागी असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार व्यापारी व्यावसायिकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली.


राज्यात औरंगाबादच्या वाळूज परिसरात हनुमान भंगार दुकानाच्या भंगार विक्रेत्यावर जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. यातून तपासाचे काही धागे दोरे अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत.


ज्या भंगार विक्रेत्यांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट फायदा घेत फसवणूक केली. अशी फसवणूक करणारे शहरातील विविध भागातील सतरापेक्षा अधिक भंगार विक्रेते या कटात सहभागी असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. 


त्या दुकानदाराला अटक करून न्यायालयासमोर नेले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. परंतु, चौकशी दरम्यान आढळून आलेल्या अन्य भंगार विक्रेत्यांचा शोध अधिकारी घेत आहेत. विभागाचे आयुक्त मनोज कुमार रजक, अतिरिक्त आयुक्य ऐस बी देशमुख, उपायुक्त चंद्रकांत केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रवीण कुमार हे पुढील तपास करत आहे.