मुंडे, सतारा : शहीद जवान संदीप सावंत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावकऱ्यांनी अश्रू नयनांनी शहीद जवान संदीप सावंत यांना अखेरचा निरोप दिला. ज्यावेळी जगभरात 31 डिसेंबरचा उत्साह साजरा होत होता. त्यावेळी जवान संदीप सावंत शत्रूंशी सिमेवर दोन हात करत होते. जम्मू काश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरमध्ये अतिरेक्यांना प्रत्युत्तर देताना संदीप सावंत यांना वीरमरण आलं. आज साताऱ्यातील मुंडे गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कराड तालुक्यातल्या मुंडे गावातील संदीप रघुनाथ सावंत यांना सीमेवर वीरमरण आले. शहीद संदीप सावंत सहा मराठा बटालियनमध्ये होते. नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलात हालचाली दिसल्या. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप सावंत आणि गोरखा रायफल्सचे अर्जुन थापा या दोघांना वीरमरण आले. 



संदीप सावंत २८ सप्टेंबर २०११ रोजी सैन्यात भरती झाले होते. त्यांचे लग्नही झाले असून दीड महिन्यांची मुलगी आहे. १२ वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करुन १८ मराठा बटालियनमध्ये सहभागी झाले होते. संदीप सावंत यांनी भरतीनंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली होती. संदीप सावंत शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव पुण्यात आणले गेले तिथून त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले.


दीड महिन्यापूर्वी शहीद जवान संदीप सावंत आपल्या मुलीला पाहण्यासाठी आणि तिच्या नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांची कुटुंबियांशी शेवटची भेट झाली. तेव्हा कुटुंबियांनी देखील कधी विचार केला नव्हता की, संदीप सावंत यांची शेवटची भेट ही अशी होईल. 



संदीप सावंत आणि रायफलमॅन अर्जुन थापा या दोघांनाही दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. या दोघांनी दाखवलेले शौर्य देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची देशाला कायम जाणीव राहील, अशा शब्दात ले. कर्नल देवेंदर आनंद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.



दरम्यान, नौशेरा परिसरात ही घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली. शोधमोहीम सुरु असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. मात्र, पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत.