शहापूर, ठाणे : महामार्गामुळे आर्थिक समृद्धी आली पण नात्यात निर्माण झाला दुरावा. कुटुंबांमधील तंट्याचे ५२ खटले दाखल, समृद्धीच्या पैशांवर अनेकांची मौजमजा. झी २४ तासचा विशेष वृत्तांत. समृद्धी प्रकल्पाला शहापूरमध्ये तीव्र विरोध झाला होता. आता सारं काही शांत असलं तरी पैसे आले आणि  अनेक मार्गांनी पटापट खर्चही झाले.  दुसरीकडे पैसे प्राप्त झालेल्या अनेक कुटुंबात भांडणं आणि कोर्टकचेऱ्या सुरु झाल्यात. शहापूरच्या समृद्धीची ही दुसरी बाजू.  एक एकरला तब्बल २ कोटी ४३ लाख मोबदला. सामान्य शेतकरीही रातोरात मालामाल. समृद्धीची ही कहाणी आहे ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा झाली आणि शहापूर परिसर चर्चेत आला तो या प्रकल्पाविरोधातल्या आंदोलनामुळे. जमीन देण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आणि सरकारनं त्यांच्या जमिनीचा मोबदला वाढवला. यात इथल्या खर्डीमध्ये एक एकरला तब्बल २ कोटी ४३ लाख इतका मोबदला दिला गेला, जो राज्यात सर्वाधिक आहे. शहापूर, कल्याण, भिवंडी या भागात लोकांनी जमिनी दिल्या आणि लोक रातोरात लक्षाधीस आणि करोडपती झाले. त्यानंतर अनेक गावात-वाड्या वस्त्यांवर समृद्धीच्या सुरस कथा रंगू लागल्या आहेत. मोठी रक्कम आल्यानं काहींनी मौजमजा केली. अनेकांनी चारचाकी खरेदीला पसंती दिली. काहींनी घराचं बांधकाम काढलं. काहींनी व्यवसाय सुरु केला तर काही चक्क पुढारी होत पोस्टरवर झळकू लागले. त्यातही सर्वात वेदनादायी बाब म्हणजे पैसे आले मात्र नाती दुरावली.


दुसरीकडे समृद्धी प्रकल्पाचा लाभ मिळावा म्हणून जमीनी बिगरशेती, औद्योगीक असल्याचं भासवून भरमसाठ मोबदला देण्याचा उद्योग तेजीत आहे. भूसंपादनातील या गैरव्यवहारांबाबत भिवंडी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आलीय. या महामार्गासाठी आत्तापर्यत 23 हजार 517 शेतकऱ्यांची जमीन संपादीत झालीये. त्या बदल्यात त्यांना सहा हजार कोटी रुपयांचा मोबदला मिळालाय.  त्यात ठाणे जिल्ह्यात सुमारे २०० कोटींचा मोबदला दिला गेला. या महामार्गावर 24 प्रस्तावीत कृषी समृद्धी केंद्र आहेत. त्यात शहापूर, कल्याण, भिवंडी आहे. या प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळतील. अचानक येणाऱ्या आर्थिक समृद्धीच्या मोहात त्या जमिनीही पुढच्या पिढीच्या हातून जाऊ नयेत एवढीच अपेक्षा.