प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर : कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या रखडलेल्या कामाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बोलावलेल्या बैठकीत अधिकारी आणि सदस्यांमध्ये वाद झाला. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाहू जन्मस्थळ आराखडा समितीच अधिकृत नसल्याचं म्हटल्याने सदस्य संतापले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातील राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या आराखड्याचे काम गेल्या बारा वर्षापासून रखडलंय. शाहू जन्मस्थळी झालेल्या बैठकीत आराखडा समितीने पुरातत्व विभागाला चांगलंच धारेवर धरलं. काळ्या यादीत असलेल्या ठेकेदाराला काम देऊ नका अशी सूचना समितीनं केली होती. तरीही त्याच ठेकेदाराला काम का दिलं? असा सवाल समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला.


यावर आराखडा समितीच अधिकृत नसल्याचं पुरातत्त्व अधिकारी तुषार घाडगे यांनी म्हटलं. त्यामुळे समिती सदस्य संतापले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही नाराजी व्यक्त केली. इतकंच नव्हे तर अभ्यास समितीच्या सूचनेप्रमाणे काम होत नसेल तर काम थांबवा, अशा सूचनाही दिल्या गेल्यात.



बैठकीच सदस्य आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वेळीच हस्तक्षेप करत दोघांची समजूत काढली. 


पुरातत्व विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शाहू जन्मस्थळाचं काम गेल्या १२ वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळेच सरकारी काम बारा महिने थांब या उक्तीचा प्रत्यय शाहू जन्मस्थळाच्या कामामध्ये वारंवार दिसून येतोय.