Sharad Pawar Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आषाढी एकादशीनिमित्त सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी आषाढीच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी आवर्जून 'महाराष्ट्रात गेल्या दशकभरात जे जातीपातीचं विष पसरलंय ते समूळ नष्ट होऊ दे' असा उल्लेख केला होता. राज यांनी केलेल्या या उल्लेखाचा रोख शरद पवारांकडे असल्याची चर्चा होती. या पोस्टवर अशा काही कमेंट्सही आल्या. इतकेच नाही तर थेट शरद पवारांनाच यावरुन विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्या खास शैलीत राज यांनाच यावरुन टोला लागावला.


राज नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली 8 शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. 'यात्रा' ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं," अशा शब्दांमध्ये राज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 


पुढे याच पोस्टमध्ये, "देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. जेंव्हा अगदी 7, 8 वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर 'महा'राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे," असं राज यांनी म्हटलं आहे. 



शरद पवारांना विचारला प्रश्न...


राज ठाकरेंनी अनेकदा जाहीर भाषणांमध्ये शरद पवारांचं थेट नाव घेत त्यांच्यावर जातीपातीचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे. पवारांनाही वेळेवेळी त्याला उत्तर दिलं आहे. पुण्यातील पत्रकारांबरोबरच्या चर्चेमध्ये राज ठाकरेंच्या पोस्टचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी, राज ठाकरेंनी असं विधान पहिल्यांदाच केलं नसल्याचा उल्लेख केला. " राज ठाकरे यांनी आजच असं वक्तव्य केलेलं नाही. ते नेहमीच असं बोलतात. ते त्यांचं वैशिष्ट्यच आहे," असं शरद पवार राज ठाकरेंच्या पोस्टसंदर्भातील प्रश्नावर म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी खोचक शब्दांमध्ये राज यांनाच सुनावलं.


शरद पवारांचा खोचक टोला


"ते (राज ठाकरे) 8-10 दिवसांनी, महिन्याने, 2 महिन्यांनी कधी जागे झाले तर असं बोलतात. साधारणत: ज्याच्यावर टिप्पणी केल्यास लोक दखल घेतात त्यांच्यावर राज ठाकरे बोलतात, टिप्पणी करतात," असंही शरद पवार मनसे अध्यक्षांना टोला लगावताना म्हणाले. यापूर्वीही अनेकदा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केलेली आहे. त्यामध्ये आता या नवीन टीकेची भर पडल्याचं पाहायला मिळत आहे.