शरद पवारांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रात माहिती उघड
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत शरद पवारांनी त्यांच्या संपत्तीविषयी विवरणपत्रात माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या संपत्तीत गेल्या ६ वर्षात ६० लाख रूपयांची वाढ झाली आहे. पवारांची संपत्ती ३२.७३ कोटी रूपये एवढी आहे.
२०१४ च्या विवरणपत्रात पवारांनी ३२.१३ कोटी रूपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं. पवारांनी १ कोटी रूपयांचं कर्ज काढलं आहे. तसंच पत्नी प्रतिभा पवार यांना अॅडव्हान्स डिपॉझिट म्हणून ५० लाख रूपये मिळाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
शरद पवारांची जंगम मालमत्ता २५ कोटी २१ लाख ३३ हजार ३२९ रुपये आहे. तर स्थावर मालमत्ता ७ कोटी ५२ लाख ३३ हजार ९४१ रुपये एवढी आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांवर १ कोटी रुपयांचं कर्ज आहे. यातले ५० लाख रुपये शरद पवारांनी अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून आणि ५० लाख रुपये पार्थ पवार यांच्याकडून घेतले आहेत. ही रक्कम शेयर ट्रान्सफरच्या बदली घेतलेलं ऍडव्हान्स डिपॉझिट आहे.