अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा मोठा डाव
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ल्याला शरद पवारांनी सुरुंग लावला आहे. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांची भेट घेत्याने चर्चेला उधाण आले आहे.
Ajit Pawar Vs Sharad Pawar : पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांना धक्का देण्यासाठी शरद पवारांनी मोठा डाव टाकला आहे. अजितदादांचा एकेकाळचा कट्टर समर्थक नेता लवकरच शरद पवार गोटात सामील होणार आहे. पिंपरीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवारांचा बालेकिल्ल्याला सुरुंग
पिंपरी चिंचवड म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला. मात्र, याच बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी सिनिअर पवारांनी मोठा डाव टाकला आहे. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात.
कोण आहेत आझम पानसरे?
पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आझम पानसरे हे मोठं नाव आहे. अजित पवारांचे एकेकाळचे कट्टर समर्थक ही त्यांची ओळख पिंपरीत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यात पानसरेंचा मोठा वाटा होता. प्रतिकूल परिस्थितीत पानसरेंनी राष्ट्रवादीची खिंड लढवली
भाजपची सत्ता आल्यानंतर आझम पानसरेंनी भाजपात प्रवेश केला. पानसरेंचा मुलगा निहाल पानसरे अजित पवार गटात सामील झाला. तर, आझम पानसरे लवकरच शरद पवारांना पाठिंबा देतील, असा दावा केला जात आहे.
काका विरुद्ध पुतण्या अशी नवी लढाई
पुण्यात पवार-पानसरे भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठेही सोबत उपस्थित होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायला त्यांनी सुरूवात केलीय. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये पवारांनी खास लक्ष घातलंय. गणेशोत्सव काळात रोहित पवारही पिंपरी चिंचवडमध्ये सक्रीय झाल्यानं काका विरुद्ध पुतण्या अशी नवी लढाई सुरू झाल्याचं चित्र दिसलं.
अजित पवार गट खिळखिळा करण्याची रणनीती
आगामी निवडणुकीत पानसरेंसारख्या कट्टर समर्थकाला मानाचं पान देऊन अजित पवार गट खिळखिळा करण्याची रणनीती पवारांनी आखलीय. पानसरेंना आपलंसं करून एकाच दगडात अजित पवार आणि भाजप असे दोन पक्षी गारद करण्याची शरद पवारांची खेळी दिसत आहे.
शरद पवार गटानंतर अजित पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव
राष्ट्रवादी कुणाची? हा वाद शिगेला पोहचलेला असतानाच आता शरद पवार गटानंतर अजित पवार गटानेही सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी विनंती अजित पवार गटाने केलीय. अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल दाखल करण्यात आलंय. अजित पवारांच्या गटातील आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत.. अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलीय. या प्रकरणाची सुनावणी उद्या म्हणजे 9 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्यामुळेच अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल करण्यात आलंय.