पवारांना जीवे मारण्याच्या धमकीबद्दल बोलताना CM शिंदेंचा ठाकरे गटावर अप्रत्यक्ष आरोप! म्हणाले, `औरंगजेब, टिपू...`
CM Eknath Shinde On Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांना ट्वीटरवरुन देण्यात आलेल्या धमकीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आवश्यकता असल्यास पवारांची सुरक्षा वाढवली जाईल असंही म्हटलं आहे. मात्र याचवेळेस त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
CM Eknath Shinde On Sharad Pawar Death Threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी (Sharad Pawar Death Threat) आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून तपासाच्या सूचना दिल्या आहेत असं मुख्यमंत्री शिंदेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मात्र याच ट्वीटमध्ये एकनाथ शिंदेंनी मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख करत शिंदेंनी केलेल्या विधानावरुन त्यांचा रोख ठाकरे गटाकडे असल्याचे दिसून येत आहे.
पवारांना मिळालेल्या धमकीबद्दल शिंदे काय म्हणाले?
'तुमचा लवकरच दाभोळकर होणार आहे,' असं ट्विट 'राजकारण महाराष्ट्राचे नर्मदाबाई पटवर्धन' या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेऊन केली. यानंतर राज्यामधील वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असताना काही दिवसांसाठी दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनीही ट्वीटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. "ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत," असं शिंदे म्हणाले आहेत.
ठाकरे गटावर साधला निशाणा
मात्र पवारांना मिळालेल्या धमकी प्रकरणावरच प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या ट्वीटमध्ये शिंदेंनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला आहे. "गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल," असं शिंदे म्हणाले आहेत. या ट्वीटमधील सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा उल्लेख हा सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठाच्या निर्णयासंदर्भातील आहे.
फडणवीसांनीही दिला इशारा
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. "राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत. महाराष्ट्रात एक उच्च परंपरा आहे. कोणत्याही नेत्याला धमक्या देणं किंवा समाजमाध्यमांवर व्यक्त होताना मर्यादा ओलांडणं हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणांमध्ये पोलिस निश्चितपणे कायद्यानुसार कारवाई करतील," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.