राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा, हिंगोलीत रस्त्यावर जाळपोळ
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी शरद पवारांना ईडी कार्यालयाने नोटीस पाठवल्यानंतर...
हिंगोली : शरद पवारांविरोधात ईडी कार्यालयाच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होऊन आंदोलन करत आहेत. हिंगोली शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात टायरची जाळपोळ करून आपला निषेध नोंदवला.
मुंबईत ईडी कार्यालय परिसरात जमावबंदी
मुंबईत शरद पवार यांनी ईडीच्या ऑफिसकडे जाऊ नयेत, पवार घराबाहेर पडले तर मुंबई कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती पोलिसांना आहे. त्यामुळे पवारांची समजूत घालण्यासाठी कायदा सुव्यवस्थेचे सहआयुक्त विनय चौबे शरद पवारांच्या भेटीला आले होते. पवारांच्या घरी बंदोबस्त वाढवण्यात आलाय. मात्र पोलिसांच्या समजुतीनंतरही पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यावर ठाम आहेत. मुंबईचं दैनंदीन जीवन विस्कळीत होऊ नये ही शरद पवारांची इच्छा असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र पवार ईडीच्या कार्यालयाकडे निघण्यावर ठाम आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी शरद पवारांना ईडी कार्यालयाने नोटीस पाठवल्यानंतर आज शरद पवार ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. दुपारी दीड वाजता वाजता ते कार्यालयात हजर राहणार आहे. पवारांच्या या ऑफिस भेटीच्या पार्श्वभूमीवर त्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. पवारांच्या ईडी कार्यालय भेटीकडे गृह मंत्रालयाची नजर आहे. पवारांच्या ईडी भेटीसंदर्भात दिल्लीत बैठक झाली. परिस्थिती चिघळली तर सीआरपीएफ जवानांना तैनात राहण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.
लातूरमध्येही पडसाद
दरम्यान, गुरुवारी शिखर बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचे पडसाद लातूरमध्येही उमटले. लातूर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अशोक हॉटेल चौकात भाजप सरकार आणि ईडीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. राजकीय आकसापोटी आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सरकारने ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी प्रवर्तन निदेशालाय अर्थात ईडी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खच्चीकरण करण्यासाठीच सरकारने ईडीला हाताशी धरून शरद पवार यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी केलाय.