`भारतात लोकशाहीच्या...`, अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar On Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Interim Bail To Arvind Kejriwal) यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता शरद पवारांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Interim Bail To Arvind Kejriwal : दारु घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दिलासा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला अटक करण्यात आली होती, अशातच आता केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने येत्या 1 जून पर्यंत अंतरिम जामीन (Interim Bail) मंजूर केला. गेल्या काही दिवसांपासून तिहार जेलमध्ये असलेल्या अरविंद केजरीवाल यांना तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर पुन्हा तुरूंगात जावं लागणार आहे. केजरीवाल यांच्या जामीन मिळाल्यानंतर दिल्लीत आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय. तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अशातच आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम जामीन आदेशाचे मी स्वागत करतो, असं शरद पवार म्हणाले आहेत. भारत लोकशाहीच्या पाठपुराव्यात स्थिर आहे, असंही पवार ट्विट करून म्हणाले. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं. मात्र त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली, म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं गेलं, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. त्यावेळी पवारांनी भाजपवर निशाणा साधला होता.
रोहित पवारांची भाजपवर टीका
ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन हा केंद्र सरकारच्या दडपशाहीला मिळालेली सणसणीत चपराक आहे. सत्तेच्या बळावर सरकारने INDIA आघाडीतील विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी न्यायालय तो आवाज दाबू देणार नाही. या निर्णयाबद्दल न्यायालयाचे आभार... आता दिल्लीतील मतदार हातात झाडू घेऊन सुकलेल्या कमळाचा कचरा साफ केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पुढील नियोजन सांगितलं. उद्या 11 वाजता कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात या, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय. तर दुपारी 1 वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे. केजरीवाल यांना घेण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते.