Jitendra Awhad Supports Truck Driver Strike: देशभरातील ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही पडू लागले आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये ट्रक चालकांच्या या संपामुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे. भाज्यांचा पुरवठ्याला बसलेल्या फटक्यामुळे भाज्यांच्या किंमती वाढल्यात, इंधनाचा पुरवठा कधीही खंडित होईल या भीतीने पेट्रोल पंपांबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी, संभाजी नगर, कल्याण, सातारा, लातूर, नागपूर, वसई-विरार नाशिकसारख्या शहरांमध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर सर्वसामान्यांच्या काही किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्यात.  अगदी स्कूल बस, रुग्णवाहिकांनाही या आंदोलनाचा फटका बसला आहे. एकीकडे या आंदोलनामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतानाच दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे. ट्रक चालक आंदोलकांच्या मागण्या योग्यच असून नवीन कायदा जाचक असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.


राक्षसी कायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आव्हाड यांनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. "केंद्र सरकारने कायद्यामध्ये जे बदल केलेत त्यामध्ये अपघातात जर कोणी मरण पावले तर वाहनचालकाला 10 वर्ष कैद आणि 10 ते 15 लाख रुपये दंड, अशी शिफारस करण्यात आली आहे. मूळात अपघात कसा झाला, अपघाताला जबाबदार कोण, याची कुठलीही तपासणी करण्याची तरतूद यामध्ये ठेवलेली नाही. एकतर जेवढ्या ट्रकचालकांची गरज आहे त्यापेक्षा 40% कमी ट्रकचालक भारतात उपलब्ध आहेत. जर असे राक्षसी कायदे करण्यात आले तर कुणीही ट्रकचालक म्हणून काम करण्यास तयार होणार नाही. हाच कायदा पुढे कारचालकांनाही लागू होणार आहे," असं आव्हाड यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं आहे.


रस्ता ओलांडणाऱ्याला दंड करणार का?


"एखाद्याने चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडला अन् अपघात झाला तर शिक्षा रस्ता ओलांडणाऱ्याला की ट्रकचालकाला द्यायची? सर्व अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळेच होतात, हे म्हणणे कितपत योग्य आहे. म्हणजेच भारतीयांना फक्त जेलचीच भीती दाखवायची, एवढेच काम आता सरकारचे उरले आहे. यात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवायचाच नाही, ही कुठली पद्धत आहे? जिथे रस्ता ओलांडायचा नसतो तिथे रस्ता ओलांडला अन् अपघात झाला तर त्याच्या घरच्यांना 10 लाखांचा दंड आकारणार का? त्याच्या घरच्यांवर ती जबाबदारी टाकणार का? कित्येक वेळा चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडणाऱ्याला वाचवताना अपघात घडतो आणि त्यात चालक दगावतात, याची जबाबदारी कोणावर?" असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.


भूमिकेला पूर्ण पाठिंबा


आपल्या पोस्टच्या शेवटी आव्हाड यांनी, "कुठलाही कायदा करताना सर्व बाजूने त्याची तपासणी करून त्याचा अंमल करावा, अशी अपेक्षा असते. एकतर्फी विचार करून कायदा होऊच शकत नाही. ट्रकचालकांनी या कायद्याला विरोध केला आहे. माझा ट्रकचालकांच्या या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे," असं म्हटलं आहे.




अशा आहेत नव्या तरतुदी


एखादा अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरुन पळून जाण्याच्या प्रकाराला हिट अ‍ॅण्ड रन असं म्हणतात. नव्या कायद्यानुसार ट्रक चालकांकडून अपघात झाला त्यांनी एखाद्या वाहनाला धडक दिली तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच 7 लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. पूर्वी हा दंड 5 लाख इतका होता. तसेच या प्रकरणामध्ये लगेच जामीनही मंजूर केला जात होता. मात्र या कायद्यात बदल करण्यात आल्याने जामीन मिळणही कठीण होणार आहे. ट्रक चालकाकडून अपघात झाला आणि अपघातात जखमी व्यक्तीला मदत न करता ट्रक चालक अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नवीन कायदे फारच कठोर असल्याचा आरोप ट्रकचालकांनी केला आहे. त्यामुळे या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून हा कायदा अति कठोर आणि अन्याय कारक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. मात्र नवीन कायद्यामध्ये अपघातानंतर जखमींना मदत करणाऱ्या त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकांना या शिक्षेमधून सूट मिळणार आहे.


नवी मुंबईतही राडा, पोलिसांना मारहाण


सोमवारी नवी मुंबईमधील उलवे येथे बेलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ट्रक चालक फारच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. बेलापूर महामार्ग रोखून धरण्याचा ट्रक चालकांचा डाव हाणून पाडला. एनआरआय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना ताब्यात घेतलं. यानंतर पनवेल-सायन रस्ता ट्रक चालकांनी रोखल्याने वाहतूक कोंडी झाली.