पवारांची कोणाला क्लिनचिट नाही, अन्वर यांची समजूत काढू - भुजबळ
`तारिक अन्वर यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, समजूत काढू`
औरंगाबाद : राजीनामा दिलेले राष्ट्रवादीचे सरचिटणीस तारिक अन्वर यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिनचिट दिलेली नाही. ताबडतोब क्लीनचीट देण्याचे काम केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस करत असतात, असे सांगत तारिक अन्वर यांची आम्ही समजूत काढू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय. आज बीडमध्ये समता परिषदेचा मेळावा आहे. या मेळाव्याला जाण्यासाठी छगन भुजबळ औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही जेपीसीची मागणी केलीय. ती आमची स्पष्ट भूमिका आहे. तारिक अन्वर यांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलायला हवं होतं. त्यांचा हा निर्णय पाहाता त्यांनी तो आता घेतलाय असं वाटत नाहीये. हे त्यांनी निमित्त ठरवलंय, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलेय.
पवारांनी मोदींची बाजू घेतल्याने पक्षात नाराजीचा सूर दिसून आला. पवारांच्या विधानामुळे नाराज झालेल्या तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर पवारांचे जवळचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अन्वर यांना जोरदार टोला लगावलाय. अन्वर यांनी पवार यांच्या विधानावरुन राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या डोक्यात आधीपासून काहीतरी चाललेले होते. त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतलाय, असे पटेल म्हणालेत.
त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राफेल विमान खरेदीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुठेही क्लीन चीट दिलेली नाही. प्रसारमाध्यमांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.