Sharad Pawar Withdraw Resignation: राजकारणातले तेल लावलेले पैलवान अशी शरद पवारांची ओळख. आताही राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पवारांनी आपल्याच पक्षातील बंडखोरांना धोबीपछाड दिल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस असल्याचं बोललं जातंय. यातलाच एक गट भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत होता. पवारांना याची कुणकुण लागली आणि त्यामुळेच त्यांनी हे राजीनामास्त्र बाहेर काढल्याचं सांगण्यात येतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये अजित पवारांनी बंड करून सकाळचा शपथविधी घडवून आणला. मात्र पवारांनी वेळीच ते बंड मोडून काढलं. आता पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. तसं झालं असतं तर पवारांच्या पदरात मोठी नामुष्की पडली असती. कारकिर्दीच्या सुरूवातीलाच बसलेला धूर्त राजकारणी हा शिक्काही उत्तरार्धात अधिक ठळक झाला असता. मात्र राजीनाम्याच्या खेळीनं राष्ट्रवादीतल्या बंडाला खीळ बसल्याचं मानलं जातंय. सारं राजकारण पवारांभोवती केंद्रित झाल्यानं विरोधकांसाठीही हा पॉवरफुल्ल दणका असल्याचं मानलं जातंय. 


आणखी वाचा - Jayant Patil: शरद पवार यांचा राजीनामा मंजूर का केला नाही? जयंत पाटलांनी सांगितलं खरं कारण!


देशाच्या राजकारणात शरद पवार हे मुरब्बी राजकारणी मानले जातात. पवारांच्या मनात नेमकं काय सुरूंय हे कुणीही सांगू शकत नाही असं त्यांच्याबद्दल कायम बोललं जातं. याहीवेळी त्यांनी केवळ कुटुंबातील चार व्यक्ती वगळता आपल्या राजीनाम्याचा सुगावा कुणालाही लागू दिला नाही. त्यांचा हा मास्टरस्ट्रोक पक्षातील संभाव्य बंडखोरांना एकाकी पाडण्यात यशस्वी ठरलाय असं म्हणायला हरकत नाही. 


काय म्हणाले शरद पवार?


मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं. सर्वांचा विचार करुन मी पुन्हा अध्यक्षपदी राहावं, या निर्णयाचा मान राखून मी माझा निर्णय मागे घेत आहे, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार दिल्लीला गेले ही चूकीची आहे. सुप्रिया सुळे अध्यक्ष होईल, यात तथ्य नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. अजित पवारांना माझ्या राजीनाम्याची पूर्वकल्पना होती, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.


पवारांच्या निर्णयाचं अजितदादांकडून स्वागत


राज्यातील,देशातील सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा,महाविकास आघाडी,देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे.


साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावं या आग्रहास्तव अध्यक्ष निवड समितीनं त्यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला.तेच अध्यक्षपदी कायम राहतील,हा निर्णय एकमतानं झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात,देशात उज्ज्वल यश संपादन करेल.


 शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी.



एकजुटीनं आणि अधिक जोमानं काम करावं, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असं आवाहन करतो. साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमानं पक्षाच्या कामाला लागलो आहोत, असं अजित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.