नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे विदर्भ दौऱ्यात आहेत, आज रात्री नागपुरात बोलताना विरोधी पक्षाला त्यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. सत्ता काही लोकांच्या डोक्यात गेली आहे, म्हणून त्यांनी सुडाचं राजकारण सुरु केलं आहे, याचा मोबदला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्याजासह परत करतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख यांच्या प्रत्येक त्रासाचा एक एक मिनिट वसूल करु, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा नागपूर दौरा होत असे, तेव्हा अनिल देशमुख सोबत असायचेच. असा एकही दौरा टळला नाही. पण आज अनिल देशमुख आत आहेत. अनिल देशमुख यांनी मला वास्तव सांगितले आहे. म्हणून अनिल देशमुख हे पुन्हा सक्रीय होतील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.


तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अनिल देशमुख हे पुन्हा त्यांच्या जागी येतील आणि सक्रीय होतील असं म्हटलं आहे. तर शरद पवारांनी अनिल देशमुख आत आहेत, आणि आरोप करणारे परमबिर सिंग आहेत तरी कुठे?, असा सवाल केला आहे.


शरद पवार यांनी सत्तेतील लोक यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं म्हटलं आहे, यात त्यांनी आपल्या निकटवर्तीयांच्या घरी टाकलेल्या धाडी, अजित पवार यांना हात लावता येत नाही म्हणून त्यांच्या बहिणींच्या घरी टाकलेल्या धाडी यांचा उच्चार केला आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले, म्हणून त्यांच्या पत्नीवर आरोप टाकण्यात आले.


हसन मुश्रीफ, एकनाथ खडसे, संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यावर धाडी टाकून केंद्रीय संस्थांनी केलेल्या कारवाईवर शरद पवारांनी टीका केली आहे.


केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु आहेत, राज्यात त्यांना सत्ता मिळाली नाही, म्हणून सुडाचं राजकारण खेळलं जात आहे. अजित पवार यांच्या घरी २०-२० अधिकारी आणून बसवून ठेवले, त्यांना विचारल्यावर दिल्लीतून आदेश असल्याचं त्यांनी सांगितलं, यावरुन लक्षात घ्या, या यंत्रणांचा कसा वापर केला जात आहे.