लोकसभा निवडणुकीबाबत शरद पवारांनी वर्तवलं भाकित
लोकसभा निवडणूक कधी होणार याबाबत अनेकांना उत्सूकता
मुंबई : आठ मार्चला लोकसभा निवडणुका जाहीर होणार आणि एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान होणार असल्याचं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलं आहे. तसंच यापूर्वी मतदान यंत्रांच कोणतंही बटन दाबलं की कमळाला मतदान जायचं. त्यामुळे बूथ प्रमुख आणि केंद्र प्रमुखांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येते आहे तसे आरोप-प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. निवडणूक कधी जाहीर होणार याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे. सगळेच पक्ष कामाला लागले आहेत.
येत्या ७ मार्च ते १० मार्च दरम्यानच्या कोणत्याही दिवशी लोकसभा निवडणुकीची तारीख घोषित होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही घोषणा होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची बैठक बोलावून देशभरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतील. त्याच दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक देखील होण्याची शक्यता आहे. येत्या १० मार्चपूर्वी लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होईल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगानेही दिले आहेत.
याआधी सर्व राज्यांनी २८ फेब्रुवारीच्या आधी प्रशाकीय तयारी आणि विशेषत: बदली प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिल्या होत्या. सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून ही सूचना देण्यात आली होती. त्यामुळे लोकसभा निवडणूक एप्रिल-मे दरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३ जूनच्या आधी नवीन लोकसभा येईल असं म्हटलं आहे. नवी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सुरक्षारक्षकांची व्यवस्था करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे.
याआधी भारत - पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लोकसभा निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशी चर्चा होती. पण मुख्य निवडणूक आयुक्तांनी या संपूर्ण चर्चांना पूर्ण विराम दिला. लोकसभेच्या निवडणुका या वेळेवरच होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा मात्र अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.