नवी दिल्ली : काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा काही अंशी सुटला असून यवतमाळची जागा काँग्रेसनं आपल्याकडेच राखल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र पुणे, नंदूरबार, अहमदनगरसह अन्य मतदारसंघांचा निर्णय अद्याप बाकी आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. पवारांच्या निवासस्थानी सुमारे ४० मिनिटं चाललेल्या या बैठकीत महाआघाडीबाबतही चर्चा करण्यात आल्याचं समजतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २५ : २३ जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय. यानुसार, महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैंकी काँग्रेस लोकसभेच्या २५ जागा लढवणार तर राष्ट्रवादी २३ जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतात. 


बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या बैठकीनंतर लगेचच अशोक चव्हाणांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, संपत कुमार, सोनल पटेल आदी उपस्थित होते. आघाडीबाबत १५ जानेवारीपर्यंत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.