बारामती : स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लोणावळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackarey) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली असून राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद   पवार (Sharad Pawar) यांनी नाना पटोले यांना टोला लगावला. 'पटोलेंसारखी माणसं लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केलं असतं, असं पवार म्हणाले. पवारांच्या या टीकेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.


शरद पवार यांनी बारामतीतील त्यांच्या गोविंद बाग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.


विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच


विधानसभा अध्यक्षपद दिलं तर ते स्वीकारण्याची तयारी आहे, असं वक्तव्य गुहागरचे आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं होतं. यावर बोलताना शरद पवार म्हणाले 'आमचा तीन पक्षांचा निर्णय स्पष्ट झाला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध नाही. आम्हा तिन्ही पक्षाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत', असं ते म्हणाले.


सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर?


केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली असून त्याचा कारभार अमित शाह यांच्याकडे देण्यात आला आहे. यानंतर देशातील सहकाराच्या चळवळीचं केंद्र असलेल्या महाराष्ट्रात गंडांतर येईल अशा चर्चा सुरु झाल्या. यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही, असं शरद पवार म्हणाले. केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीवर गंडांतर आणेल या बातम्यांना फारसा अर्थ नाही. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारचा आहे, असं ते म्हणाले.