अधिवेशनानंतर 2 दिवसात मंत्रीमंडळ विस्ताराला तयार- पवार
नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता...
नागपूर : नागपूरचे अधिवेशन संपल्यानंतर दोन दिवसात मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. काँग्रेसला विस्तार करायला वेळ लागू शकतो. मात्र आपण अधिवेशनानंतर दोन दिवसात विस्तार करायला तयार असल्याची माहिती शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत दिली आहे. नागपुरात दाखल झालेल्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. महाराष्ट्र विकासआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शरद पवारांनी राज्याच्या राजकारणात जास्त लक्ष घातलं आहे.
पहिल्या दिवशी सावरकरांच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या भाजपनं आज शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी तसंच हेक्टर २५ हजार रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. तसंच दोन्ही सभागृहात गोंधळ घातला.
हिवाळी अधिवेशनाच्या आधी महाआघाडीच्या सरकारचं खाते वाटप झालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शपथ घेतलेल्या 6 मंत्र्यांमध्येच हे खातेवाटप करण्य़ात आलं आहे. नवीन मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळतं आणि कोणाला कोणतं मंत्रिपद मिळतं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्सूकता आहे.
राज्यात महाराष्ट्र विकासआघाडीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अजून ही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांना सध्या खाती वाटून देण्यात आली आहेत.