`मी मोदींना म्हटलं हिंमत असेल तर...`, शरद पवारांचं थेट चॅलेंज; `मोदी की गॅरंटी`च्या खर्चावरुनही कडाडले
Sharad Pawar Challenge To PM Modi: शरद पवार यांनी लोणावळ्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना अगदी मोदी की गॅरंटीच्या जाहिरातींपासून ते भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या मुद्द्यावरुनही तिखट शब्दांमध्ये टीका केली.
Sharad Pawar Challenge To PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील आठवड्यात यवतमाळमधील सभेमध्ये थेट उल्लेख न करता माजी केंद्रीय कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. टकेंद्र सरकारमध्ये सध्याच्या इंडिया आघाडीचं सरकार होतं तेव्हाचे केंद्रीय कृषीमंत्री महाराष्ट्राचे होते. त्यावेळी दिल्लीत शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज घोषित व्हायचे. मात्र मधल्या मध्येच ती लुटली जायची,' असा घणाघात मोदींनी केला होता. काँग्रेसचं सरकार असताना दिल्लीतून 1 रुपया निघायचा आणि इथे 15 पैसेच पोहोचायचे, असं मोदींनी टीका करताना म्हटलेलं. या टीकेला आज लोणावळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शरद पवारांनी जशास तसं उत्तर दिलं. 'शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार आहोत असं आश्वासन मोदी सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र मागील 10 वर्षांपासून मोदी सत्तेत आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं का?" असा सवाल पवारांनी उपस्थित केला. "उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ आणली हीच मोदी गॅरंटी दिली," अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी निशाणा साधला.
अशोक चव्हाणांचा संदर्भ
काही आठवड्यांपूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रवेश केला. याचाच संदर्भ देत शरद पवारांनी टोला लगावला. “आदर्श घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे असा आरोप भाजपाने केला. भाजपाने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. त्यानंतर सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपात गेले. त्यानंतर पंधराव्या दिवशी ते भाजपाचे खासदार झाले," अशी आठवण पवारांनी करुन दिली. "राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचारी पार्टी असं म्हणाले, राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळ्याचा आरोप केला.” असंही शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.
अजित पवारांचा थेट उल्लेख न करता टोला
शरद पवारांनी अजित पवारांचा थेट उल्लेख न करता भाजपाला टोला लगावला. "आमच्यावर आरोप झाल्यानंतर मी मोदींना म्हटलं हिंमत असेल तर चौकशी करा. दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ द्या. मात्र पुढे काय घडलं? ज्यांच्यावर आरोप केले तेच आज भाजपासह जाऊन बसले. त्यामुळे भाजपा ही वॉशिंग मशीन झाली आहे. आधी आरोप करायचे, मग पक्ष प्रवेश देऊन त्यांना धुवून काढायचं," अशी टीका शरद पवारांनी केली. पवार इतक्यावरच थांबले नाहीत तर मोदींकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचंही शरद पवार म्हणाले. "मोदींकडून सत्तेचा गैरवापर केला जातो आहे. झारखंड, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये तेच घडलं. नोटीस द्यायची, समन्स बजावायचे आणि तुरुंगात टाकायचे. आता तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक होऊ शकते," असंही शरद पवार म्हणाले.
नक्की वाचा >> भाजपाच्या पार्टी फंडासाठी मोदींकडून देणगी; स्वत: शेअर केली पावती! देणगीची रक्कम...
कोणाच्या पैशातून गॅरंटीच्या जाहिराती देता?
“पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही. जवाहरलाल नेहरूंबद्दल काहीही बोललं जातंय. गांधी, सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू यांचं योगदान हे देश स्वतंत्र करण्यासाठी होतं. अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायचे असते. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देत आहेत. त्यात मोदींची गॅरंटी देत आहेत. पण ही जाहिराती कोणाच्या पैशाने दिली जातेय? जनतेच्या पैशाने हे गॅरंटी देत आहेत,” अशी टीका शरद पवार यांनी केली. “