हर्षवर्धन पाटलांसाठी पवारांनी एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा
हर्षवर्धन पाटील भाजपात जाणार अशी शक्यता असताना इंदापूरच्या जागेवर तोडगा निघेल, असा विश्वास
इंदापूरहून अरुण मेहेत्रे तर दिल्लीहून रामराजे शिंदे : हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील भाजपात जाणार अशी शक्यता असताना इंदापूरच्या जागेवर तोडगा निघेल, असा विश्वास काँग्रेसला वाटतोय. मग पाटलांनी निर्वाणीचा इशारा देईपर्यंत हे सगळं ताणलं का गेलं, हा खरा प्रश्न आहे..
काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा हा निर्वाणीचा इशारा...
इंदापूरच्या सभेत हर्षवर्धन पाटलांची ही खदखद जाहीर झाल्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याचं कळतंय. इंदापूरच्या जागेवर तोडगा निघेल, असा विश्वास काँग्रेसला आहे.
तोडगा निघेल असं काँग्रेसला वाटत असलं तरी राष्ट्रवादीनं पुन्हा हा दावा खोडून काढलाय.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सगळेच स्वतंत्र लढले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे निवडून आले. लोकसभा निवडणुकीआधीच हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा होती. पण लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत करावी आणि विधानसभेच्या वेळी राष्ट्रवादी हर्षवर्धन पाटलांना मदत करेल, असं ठरल्याचं सांगितलं जातं. पण विद्यमान आमदाराची जागा सोडायला राष्ट्रवादी तयार नव्हती.
हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादीवर केलेला जाहीर दगाबाजीचा आरोप, भाजपात जाणार जाणार अशा सततच्या चर्चा आणि इंदापूरच्या विजयाची समीकरणं यावर सगळं ठरणार आहे.... राष्ट्रवादीला हर्षवर्धन पाटलांसाठी जागा सोडायची होती तर मेळाव्याच्या आधीच पवार आणि काँग्रेस चर्चा का झाली नाही..... आता हर्षवर्धन पाटील उपसलेली तलवार म्यान करणार का.... हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल.